पुरंदर विमानतळ भूसंपादन मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू : विजय शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 08:28 PM2018-06-13T20:28:56+5:302018-06-13T20:30:20+5:30
शेतक-यांना जमिनीचा मोबदला कोणत्या स्वरूपाचा दिला जावा, याबाबतची निश्चिती झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
पुणे : राज्य शासनाने पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा निर्णय घेऊन एक महिना झाला. मात्र, त्यानंतर विमानतळाच्या भूसंपादनाबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, शेतक-यांना भूसंपादनाच्या बदल्यात कोणत्या स्वरुपाचा मोबदला दिला जावा, यासंदर्भातील निश्चितीचे काम सुरू आहे,असे राज्याचे जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी ‘लोकमत’शी सांगितले.
संरक्षण विभाग व केंद्र शासनाच्या सर्व समित्यांकडून पुरंदर विमानतळासाठी गेल्या महिन्यातच सर्व मान्यता प्राप्त झाल्या.त्यामुळे राज्य शासनाने पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा अध्यादेश प्रसिध्द केला. तसेच समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम अतिशय जलद गतीने करणारे नवल किशोर राम यांची पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. परंतु, शासनाकडून जिल्हा प्रशासनाला भूसंपादनाच्या बाबत अद्याप पुढील आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यातच पीएमआरडीएतर्फे केल्या जाणा-या रिंगरोडचे काम रखडले आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीएमआरडीएला नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विमानतळाकडे जाण्यासाठी रस्त्ये आवश्यक आहेत. रिंगरोड व इतर रस्त्यांची कामे पावसाळ्यात करता येणे शक्य नाही. त्यामुळे विमानतळ व त्याच्याशी निगडीत असणारी विकास कामे ठप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवतारे म्हणाले, शेतक-यांच्या जमिनींची खरेदी करावी, त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी आदी पर्यायांचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील पारगाव,खानवडी,मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील सुमारे २ हजार ३६७ हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शासनास सादर करण्यात आला. जमीन मोबदल्यासाठी अंदाजे २ हजार ७१३ कोटी रुपये तर फळझाडे, विहिरी,ताली इत्यादी साठी अंदाजे ८०० कोटी मोबदला खर्च अपेक्षित असल्याचे शासनाला कळविण्यात आले. मात्र,शेतकऱ्यांना जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी अदा केला जाणार, निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणार,जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन दिली जाणार की जमीन मालकाला भागीदार करुन घेतले जाणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकारी व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.