धामणीत मोजक्याच मानाच्या काठ्यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:12 AM2021-03-01T04:12:48+5:302021-03-01T04:12:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत यात्रेचा माघ वद्य प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवाची सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत यात्रेचा माघ वद्य प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवाची सुरुवात निरनिराळ्या गावांतील मानकऱ्याच्या पारंपरिक नवसाच्या काठीच्या मिरवणुका वाद्याच्या गजरात व भंडारा उधळून हजारो भाविकांच्या उपस्थितीत होत असतो. परंतु यंदा कोरोनामुळे खंडोबाची यात्रा रद्द झाल्याने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या काठीची मिरवणूक सकाळी सहा वाजता काढण्यात आली.
दरवर्षी या मानाच्या काठ्याची मिरवणूक दुपारी बारा वाजेपर्यत चालते. यंदा ही मानाच्या काठ्याची मिरवणूक दीड तासात संपवण्यात आली.
देवाच्या मानाच्या काठ्याचे मानकरी श्री राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द), पंचरास मंडळी (संविदणे), घोडे आणि घोडेकर मंडळी (कवठे येमाई), वाळुंज मंडळी (वाळूंजनगर लोणी), आगरकर मंडळी (पाबळ), नरके मंडळी (तळेगाव ढमढेरे) ही आंबेगाव शिरुर तालुक्यातील नवसाच्या काठीच्या मानकऱ्याची कुळे समाविष्ट असल्याचे देवाचे पुजारी भगत मंडळीनी सांगितले. या सर्व कुळांनी संकटाच्या काळातही या पारंपरिक सोहळ्याचा वारसा आजतागायत जपल्याचे काठीचे मानकरी राजगुरु मंडळीनी या वेळी सांगितले.
राजगुरु, पंचरास, घोडे, घोडेकर, वाळुंज, आगरकर आणि नरके या मानाच्या काठीच्या मानकऱ्यांनी आपल्या मोजक्या भाविकांसह मिरवणुकीने देवाच्या म्हाळसाई प्रवेशद्वाराजवळ आले. या महाद्वारावरील देवाच्या घोड्याला मानाच्या काठी टेकवण्यात येऊन सदानंदाचा येळकोट हा जयघोष करत मानाच्या काठीच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या वेळी देवाच्या काठीच्या मानकऱ्यांचा देवस्थानाचे व ग्रामस्थांच्या वतीने मानाचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंचर पोलिसांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणारे भेदिकांचे सवाल जवाब, हालगी वाद्य स्पर्धा, कुस्त्यांचा आखाडा, लोकनाट्य तमाशा हे कार्यक्रम रद्द झाल्याने मंदिर व परिसरात शुकशुकाट होता.