आमदारांच्या कार्यअहवालाच्या कार्यक्रमात स्वपक्षीयांची कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 04:34 AM2019-07-25T04:34:14+5:302019-07-25T04:34:28+5:30
‘शिवाजीनगर’मधील खदखद आली बाहेर
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर मतदारसंघामधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरु असलेली धुसपुस अखेर आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाहेर पडली़ भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणणाºया काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात आमदारांच्या विरोधात फलक फडकावून घोषणाबाजी केली़ तसेच गॅलरीतून पत्रके हवेत भिरकाविली़ या मुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ निर्माण झाला़ अखेर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचेही न ऐकता कार्यकर्ते घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर निघून गेले़ भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडत पत्रके भिरकाविली.
शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन कार्यक्रम बुधवारी सायंकाळी घोले रोडवरील नेहरु सभागृहात आयोजित करण्यात आला होता़ नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सायंकाळी ५ वाजताचा कार्यक्रम प्रत्यक्षात साडेसहा वाजता सुरु झाला़ कार्यक्रम सुरु झाल्यानंतर आमदार विजय काळे हे बोलण्यासाठी उभे राहताच सभागृहाच्या वरच्या भागात बसलेले कार्यकर्ते उठले व त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली़ त्यांनी एक फलकही फडकाविला़
त्यावर ‘ज्या कार्यकर्त्यांनी केले तुम्हाला आमदार त्या कार्यकर्त्यांची लावली वाट आता तेच कार्यकर्ते तुम्हाला दाखवणार कात्रजचा घाट’ असा मजकूर लिहिलेला होता़ हे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते़ काही वेळ घोषणाबाजी करुन सभागृहात पत्रके भिरकावून हे कार्यकर्ते बाहेर निघून गेले़ त्यानंतर कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ पार पडला़
आमदारांच्या कार्यक्रमात त्यांच्याविरोधात झालेल्या घोषणाबाजीचे व्हिडिओ तातडीने व्हायरल होऊ लागले़ त्यामुळे त्याची शहरभर एकच चर्चा सुरु झाली आहे़ विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी केल्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे़ शिवाजीनगर मतदारसंघातून अनेक जण इच्छुक असून त्यांच्यातील रस्सीखेचीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते़