पुण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 02:54 PM2022-05-06T14:54:04+5:302022-05-06T14:57:17+5:30
सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याकडून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध आंदोलन
पुणे : महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दीड वर्षांपूर्वी केला होता. त्यांच्या विरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. परंतु, चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी येणार असल्याची माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन बाहेर सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले.
मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर, अमर पवार, तुषार काकडे, प्रसाद कोंडे, करण जगताप, देवदास लोणकर, मल्लिनाथ गुरवे आदी सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सर्वांना बसवून ठेवण्यात आले. मात्र, दोन-अडीच तासानंतर सर्वांना सोडून देण्यात आले.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुन्हा दाखल केला होता. चौकशीसाठी गुरूवारी येणार असल्याचे कळाल्याने सदावर्ते यांचा निषेध करण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो होतो. छत्रपतींचा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती सहन करणार नाही. येथून पुढे ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांनी छत्रपतींबद्दल बोलताना किंवा त्यांच्या गादी बद्दल बोलताना संयम बाळगावा. अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करू.
- सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
सतत मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असलेल्या ॲड. सदावर्ते यांची विकृती एसटी कामगारांच्या संप वेळी अधोरेखित झाली आहेच. तसेच छत्रपतींच्या गादीबद्दल सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला ढकलत पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्याचा आम्ही निषेध करतो.
- तुषार काकडे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा