पुणे जिल्ह्यातील २६ टक्के कंपन्यांचे उत्पादन कोविडपूर्व पातळीवर : 'एमसीसीआयए'ची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:31 PM2020-12-01T18:31:34+5:302020-12-01T18:35:15+5:30
नोव्हेंबरअखेरीस जिल्ह्यातील कंपन्यांचे उत्पादन पोहचले आहे ८० टक्क्यांपर्यंत
पुणे (पिंपरी) : लॉकडाऊन (टाळेबंदी) शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील उद्योगांचा गाडा पूर्वपदावर येत आहे. नोव्हेंबरअखेरीस जिल्ह्यातील कंपन्यांचे उत्पादन ८० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. तर, २६ टक्के कंपन्यांनी कोविडपूर्व उत्पादन स्थिती गाठली आहे. तसेच, कामगारांची उपस्थिती क्षमतेच्या ८२ टक्के झाली असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) पाहणीत समोर आले आहे.
कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्याता आला. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर उद्योगधंदे ठप्प पडले. मे महिन्यात कोविडपूर्व क्षमतेच्या तुलनेत अवघे ३२ टक्के उत्पादन होत होते. तर, केवळ २३ टक्के कामगारांची उपस्थिती होती. जून महिन्यात टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर उद्योगधंदे हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर उद्योगाचा गाडा रुळावर येण्यास सुरुवात झाली. टाळेबंदी उठविल्यानंतर मागणीअभावी अनेक उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. ऑगस्ट महिनाअखेरीस कोविडपूर्व उत्पादन क्षमता गाठण्यात यश आले.
नोव्हेंबर महिनाअखेरीस जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये ८० टक्के क्षमतेने उत्पादन होत असून, कामगारांची उपस्थिती ८२ टक्क्यांवर गेली आहे. एमसीसीआयने जिल्ह्यातील दीडशे कंपन्यांच्या केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. या कंपन्यांमध्ये ६९ टक्के कंपन्या उत्पादन क्षेत्रातील असून ११ टक्के सेवा क्षेत्रातील आहेत. तर, उर्वरित उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील २६ टक्के कंपन्यांनी उत्पादन कोविडपूर्व स्थितीला गेल्याचे सांगितले. तर, २२ टक्के कंपन्यांना ही स्थिती गाठण्यास तीन महिन्यांहून कमी कालावधी लागेल असे वाटते. तर, २५ टक्के कंपन्यांना ३ ते सहा महिने तर १८ टक्के कंपन्यांना ६ ते नऊ महिन्यांचा कालावधील लागेल असे वाटत आहे. तसेच सात टक्के कंपन्यांनी नऊ महिन्यांहून अधिक कालावधी लागेल असे सांगितले. तर, एक टक्के कंपन्यांनी त्यावर भाष्य करता येणार नसल्याचे सांगितले. लघू, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचा गाडा वेगाने रुळावर येत आहे. त्या तुलनेत सूक्ष्म क्षेत्रातील कंपन्या कूर्मगतीने चालत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
-----------------------
उद्योग क्षेत्रनिहाय स्थिती टक्क्यांमध्ये
उद्योग स्थिती सूक्ष्म लघू मध्यम मोठे
चालू उत्पादन ५४ ७९.८३ ८७
कामगार उपस्थिती ६५ ८५. ८३ ८९
--------------
महिनानिहाय उत्पादन-कामगार क्षमता टक्क्यांत
महिना उत्पादन क्षमता कामगारांची उपस्थिती
मे ३२ २३
जून ३६ --
जुलै ४० ४७
ऑगस्ट ५१ ५९
सप्टेंबर ५५ ६०
ऑक्टोबर ७२ ७७
नोव्हेंबर ८० ८२