चायनीज वांगीपिकाचे उत्पादन यशस्वी
By admin | Published: September 12, 2016 02:14 AM2016-09-12T02:14:02+5:302016-09-12T02:14:02+5:30
ग्रामीण भागात चायनीज वांगीपिकाचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया चिंचोडी देशपांडे येथिल शेतकरी राजू केशव शेवाळे यांनी साधली आहे.
विलास शेटे, मंचर
ग्रामीण भागात चायनीज वांगीपिकाचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया चिंचोडी देशपांडे येथिल शेतकरी राजू केशव शेवाळे यांनी साधली आहे. ब्रिजल नागपुरी चिवचिव जातीच्या वांगीपिकाने शेतकरी शेवाळे यांना चांगलाच आधार दिला आहे.
चिंचोडी देशपांडे येथील शेतकरी राजू केशव शेवाळे मोठ्या क्षेत्रात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतात. दरवर्षी चांगली साथ देणाऱ्या टोमॅटोपिकाने यावर्षी मात्र साफ निराशा केली आहे. टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेऊनसुद्धा जेमतेम भांडवल वसूल झाले. टोमॅटो पिकातील अपयशानंतर शेतकरी राजू शेवाळे वांगीपिकाकडे वळले. ग्रामीण भागातील शेतकरी बहुधा काटेरी वांग्याचे पीक घेतात. मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन चायनीज वांगीपिकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय शेवाळे यांनी घेतला.
राजू शेवाळे यांचा शेतातील उत्पादित माल मॉलला दिला जातो. या मॉलमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर चायनीज वांग्यांना चांगली मागणी व भाव असल्याची माहिती मिळाली.
खुरपणी, औषध फवारणी, वेळेवर खताची मात्रा दिल्याने पीक जोमदार आले. जालिंदर निघोट, राजेंद्र अन्सीराम शेवाळे व नितीन शेवाळे यांनी पिकाबाबत मार्गदर्शन केले. दोन महिन्यांत पीक तोडणीस आले. सुरुवातीस वांगीपिकास २५ रु. किलो असा बाजारभाव मिळाला व शेवटपर्यंत तो तसाच टिकून राहिला. २३ तोडे वांगीपिकाचे झाले. सर्व माल मॉलमध्ये दिल्याने हमीभाव उपलब्ध झाला. वांगीपिकाला २५ हजार रुपये खर्च आला होता. खर्च वजा जाता पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. चायनीज वांगी या भागात खाण्यासाठी वापरली जात नसली तरी मुंबईमधील हॉटेलमध्ये त्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे पिकाचा बाजारभाव टिकून राहतो. राजू केशव शेवाळे यांच्या चायनीज वांगीपिकाला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची पीक पद्धती इतर शेतकरी समजावून घेत आहेत. शेवाळे यांनी पुन्हा याच वांगीपिकाचे उत्पादन घेण्याचे ठरवले असून नुकतीच लागवड केली आहे.