तुषार सिंचनचा वापर करून कोथिंबिरीचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:15+5:302021-06-02T04:10:15+5:30
तुषार सिंचनचा वापरामुळे कोथिंबीर उत्पादनात वाढ -- नीरा : पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ...
तुषार सिंचनचा वापरामुळे कोथिंबीर उत्पादनात वाढ
--
नीरा : पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील शेतकरी कमीत कमी पाण्यावरील शेती उत्पादन घेतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व उन्हाळ्यात भरघोस उत्पादनासाठी विविध प्रयोग करतात. कर्नलवाडी गावातील युवक तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून कोथिंबिरीचे उत्पादन घेत आहेत.
कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील प्रवीण शिवाजी निगडे हे युवा शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात.
कोथिंबीर, मेथी, कांदा आदी पिकांना तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने उत्पन्नात वाढ होते.
पिकावर रोग व अळी होत नाही. तुषार सिंचनाचे तुषार तीन ते चार फुटांपर्यंत उडत असल्याने उन्हाळ्यातही पिकाचे तापमान नियंत्रित राहते. पूर्ण पिकावर तुषार पडल्याने पीक धुऊन निघते. तुषार सिंचनाचा एका एकरासाठी २०,००० रु. पर्यंत खर्च येतो. तुषार सिंचन व्यवस्थित वापरले तर ८ ते १० वर्षे टिकते. कोथिंबीर, मेथी व सुरुवातीला एक ते दोन महिन्यापर्यंत कांद्यासाठीपण याचा उपयोग होतो. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांचा डोस देता येतो, पण तुषार सिंचनातून औषध नाही देत येत.
या वर्षी कर्नलवाडीत संग्राम निगडे, अनिल निगडे, विराज निगडे, आदित्य निगडे, योगेश भोईटे, नितीन निगडे, ज्ञानेश्वर रंगराव निगडे, सुशील निगडे, पोपट निगडे, छाया निगडे यांनी कोथिंबीर, मेथी केली आहे. पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी दिले तर पाणी जास्त प्रमाणात लागते व पाणी मुरत जाते. तुषार सिंचनामुळे पाणी कमी लागते व उत्पन्नात वाढ होते. तुषार सिंचनावर सुरुवातीचे १० ते १२ दिवस रोज अर्धा तास व नंतर एक दिवसाआड पाणी द्यावे लागते. १६×१०० फूट कंपनीचे अंतर असले तरी निगडे यांनी १२×१७० फूट अंतरावर ठेवले आहे.
तुषार सिंचनाला शासनाचे अनुदान मिळते, परंतु शासनाचा नियम आत्ता ८० टक्के सबसिडी आहे. तुषार सिंचनाचा खर्च कमी येतो व शेतकऱ्याला ठिबकला सबसिडी घेतली तर जास्त फायदा होतो. शासनाची सबसिडी एका शेतकऱ्यास ७ वर्षांत एकदाच मिळते. तुषार सिंचनावर या वर्षी ४ थे पीक आहे. अर्ध्या एकरामध्ये तुषार सिंचनाचा खर्च वजा जाता आतापर्यंत १,००,०० रु. चा फायदा झाला आहे. या वर्षी कोथिंबिरीला दर कमी आहेत. त्यामुळे अर्ध्या एकरसाठी ४० हजार ते ५० हजार रुपये येत असल्याचे उपसरपंच सारिका पोपट निगडे यांनी सांगितले.
--
चौकट
--
देहू येथे स्थायिक असलेले आदित्य दीपक निगडे यांचे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. पण नोकरीच्या मागे न लागता या वर्षी त्यांनी आजोबा भगवान निगडे यांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीर केली. त्यांना सर्वात जास्त सव्वा एकरातील १ लाख १० हजार रुपयांची कोथिंबीर सोमवारी शेतातच विक्रीस गेली आहे. त्यांला अंदाजे स्पिंकलरसहित २२ हजारांचा खर्च आला.
--
फोटो क्रमांक- ०१नीरा
फोटोओळ : तुषार सिंचनाच्या साहाय्याने कोथिंबीर लावल्याने भरात आलेली कोथिंबीर. (छाया : भरत निगडे)