कडक उन्हाचा आंबा उत्पादकांना फटका : गावरान हापूसच्या उत्पादनात ६० टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:05 PM2019-05-31T19:05:17+5:302019-05-31T19:07:36+5:30
गेल्या एक महिन्यांपासून पडलेला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादक शेतक-यांना फसला आहे.
पुणे : गेल्या एक महिन्यांपासून पडलेला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादक शेतक-यांना फसला आहे. यामुळे गावरान हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ६० टक्क्यांनी घटले आहे. याशिवाय कडक उन्हाचा रायवळ आंब्याच्या उत्पदनावर देखील परिणाम झाला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजडारामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून गावरान हापूस आंब्याची तुरळक प्रमाणात आवक सुरु झाली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने मुळशी तालुक्यातील उरावडे, बेलावडे परिसारातून गावरान हापूस आंबा विक्रीसाठी येतो. गावरान हापूस आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जात असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी असते. परंतु यंदा देवगड, रत्नागिरी आणि कार्नाटक हापूसच्या उत्पादनात तब्बल ५० टक्के घट झाली आहे. तर गावरान हापूसच्या उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे.
यामुळे सध्या मार्केट मध्ये तुरळक प्रमाणात गावरान हापूसची आवक सुरु झाली आहे.सध्या दरोरड केवळ दहा ते बारा डाग इतकीच आवक सुरु आहे. यामध्ये प्रत्येक डागामध्ये सुमारे १० ते १२ डझन इतके आंबे असतात. गावरान हापूस आंब्याला प्रति डझनास २०० रुपये तर पायरीला १०० रुपये डझनचा भाव मिळत आहे. रायवळ आंबा देखील दाखल होत असून, ३० ते ५० रुपये प्रति डझनाने आंबा विक्रीसाठी बाजारामध्ये आला आहे. याबाबत गावरान हापूसचे व्यापारी तात्या कोंडे यांनी सांगितले की, रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दर वर्षी १५ मेच्या दरम्यान गावरान हापूसची आवक सुरु होते. परंतु यंदा आवक देखील उशीरा सुरु झाली असून, अत्यंत तुरळकर स्वरुपाची आहे. परंतु येत्या रविवार पासून आवक चांगली वाढले असा अंदाज कोंडे यांनी व्यक्त केला.