भारत बायोटेकच्या लशींचे पुण्यातील उत्पादन लवकरच सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:42 PM2022-02-02T19:42:58+5:302022-02-02T19:52:50+5:30
पुणे जिल्ह्यात ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या उत्पादन अखेर लवकरच सुरू होणार आहे....
पुणे : पुण्यासह देशाचे लक्ष लागलेल्या मांजरी येथे कोरोना प्रतिबंधक लशींच्या उत्पादनासाठी ‘भारत बायोटेक’ या कंपनीकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या उत्पादन अखेर लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी बुधवार (दि.2) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी कंपनीच्या वतीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ( डीसीजीआय) अंतिम लायन्ससाठी अर्ज केला. ही परवानगी मिळाल्यानंतर त्वरीत उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून, लसीकरण झालेल्या देशांमध्ये रुग्ण संख्या अधिक असून देखील गंभीर रुग्ण व मृत्यूदर खूपच कमी आहे. यामुळेच पुन्हा एकदा कोरोना लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. भविष्यातील लसीची मागणी वाढू शकते हे लक्षात घेऊन भारत बायोटेकच्या लसीचे उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी व संबंधित सर्व अधिकारी यांनी माजरी येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणाऱ्या हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अत्यावश्यक परवानग्या दिल्या आहेत. प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले असून, ड्राय रन देखील घेण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, या कंपनीशी चर्चा करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कंपनीसाठी अत्यावश्यक असलेले परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी डीसीजीआयची परवानगी मिळाल्यानंतर त्वरीत उत्पादन सुरू होईल.
कोरोना लशींच्या निर्मिती संदर्भात भारत बायोटेक कंपनीच्या अधिका-यांशी नियमित संपर्क ठेवून आहे. सध्या सर्व प्रक्रीया पूर्ण झाली असून, अंतिम लायन्स मिळाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन लवकरच सुरू होणार असल्याचे कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी