आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 08:32 AM2024-06-17T08:32:36+5:302024-06-17T08:33:02+5:30
आइस्क्रीममध्ये मानवी बोटप्रकरणी कारवाई.
लोकमत न्यूज नेटवर्क, इंदापूर (जि. पुणे) : मुंबईतील मालाड येथे आइस्क्रीमच्या कोनात सापडलेल्या मानवी बोटाच्या पेरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्युन डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, डेअरी सील करण्यात आलेली नाही. मालाड येथे यम्मो कंपनीच्या आइस्क्रीममध्ये मानवी हाताच्या बोटाचे पेर सापडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गाजियाबाद येथील ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमधील फॉर्च्युन डेअरीकडून आइस्क्रीम बनवून घेत होती, असे समोर आले आहे.
डेअरीचे भागीदार व संचालक सचिन जाधव म्हणाले, फॉर्च्युन डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन करते. दुधापासून भुकटी व बटर बनवण्यात येते. १६ सप्टेंबर २०२३ पासून आमची कंपनी यम्मो कंपनीचे आइस्क्रीम बनवण्याचे काम करत आहे. ती कंपनी गाजियाबाद येथून हे आइस्क्रीम बनवून घेते. सदर कंपनीवर १२ जून २०२४ रोजी तक्रार झालेली आहे.
या प्रकरणातील यम्माे ही आइस्क्रीम बनवणारी कंपनी आहे. ते अनेक कंपन्यांकडून आइस्क्रीम बनवून घेते. तसेच हडपसर येथील वाल्काे इंडस्ट्रीजकडून आइस्क्रीम बनवून घेत असल्याने तेथील काही नमुने घेतले आहेत. इंदापूरसह इतरही काही युनिट आहेत. त्यांना एफएसएसआयने परवानगी दिली आहे.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, एफडीए (अन्न विभाग) पुणे विभाग