Pune Crime : सावकाराच्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे व्यावसायिक बेपत्ता
By विवेक भुसे | Published: October 11, 2022 03:58 PM2022-10-11T15:58:30+5:302022-10-11T16:00:06+5:30
हा प्रकार फेब्रुवारी २०१७ ते मार्च २०२१ पर्यंतच्या कालावधीत घडला आहे....
पुणे : व्यवसायासाठी ८ लाखांवर १९ लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी १५ लाखांची मागणी केली गेली. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याने व्यवसायिक घरातून बेपत्ता झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी या सावकाराला अटक केली आहे. पराग गायकवाड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर पर्वती) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील एका २७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१७ ते मार्च २०२१ पर्यंतच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती हे व्यवसायिक असून, त्यांचा चहाचा स्वतःचा ब्रॅण्ड आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांच्या पतीने पराग गायकवाड याच्याकडून ८ लाख रुपये १२ ते १५ टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्ल्यात त्यांनी गायकवाड याला तब्बल १९ लाख रुपये दिले. मात्र तरी देखील गायकवाड हा फिर्यादीचे आई-वडील व पतीला जीवे ठार करण्याची धमकी देऊन तुम्ही दोघांनी मला खूप त्रास दिला आहे. तुमच्याकडून मला माझ्या व्याजाचे ९ लाख रुपये येणे बाकी आहे. परंतू तुम्ही मला वेळेवर रक्कम दिली नाही. त्यामुळे तुम्हाला मला आता १५ लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून खंडणीची मागणी केली. तसेच ती दिली नाही तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
गायकवाड याच्या तगाद्याने फिर्यादीचे पती ८ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीची चौकशी करून त्यांच्या पतीचा शोध घेत असताना पोलिसांना व्याजाच्या पैशाचा हा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्या पतीने व्यवसायासाठी गायकवाड याच्याकडून व्याजाने कर्ज घेतले होते. व्याजाच्यापोटी १९ लाख रुपये दिल्यानंतर देखील गायकवाड हा १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता. हरविल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशीदरम्यान हा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकार पराग गायकवाड याला अटक केली आहे.
- श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ