एफडीए नोंदणीसाठी व्यावसायिक धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:18 AM2018-04-12T00:18:13+5:302018-04-12T00:18:13+5:30
कायद्यानुसार सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी एफडीएकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेस व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
पुणे : कायद्यानुसार सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी एफडीएकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेस व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत पुणे विभागातील ६ हजार ८५२ व्यावसायिकांनी नोंदणी केली असून २ हजार ८७६ व्यावसयिकांना परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यात पुणे विभाग आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कायद्यातील तरतुदीनुसार फळविक्रेता, भाजीविक्रेता, मांस, अंडीविक्रेता, उपहारगृहे, मिठाई उत्पादक विक्रेते, वाईन, बिअर शॉप, पाणीपुरी, भेळविक्रेता, हॉटेल्स, बेकरी उत्पादक, आॅईल मिल आदींनी एफडीएकडे नोंदणी करणे व परवाने घेणे बंधनकारक आहे. परंतु, काही व्यावसायिकांकडून नोंदणी व परवाना घेण्याबाबत उदासीन होते.
त्यामुळे एफडीएकडून १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार २४६ जगांना परवान्याचे
वितरण करण्यात आले तर ३
हजार ८०७ व्यावसायिकांनी नोंदणी करून घेतली.
>महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वये अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच त्यांना ६ महिने कारावास व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घ्यावा, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले होते. त्यास व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
- शिवाजी देसाई,
पुणे विभागाचे
एफडीएचे सहआयुक्त
>एफडीएकडील परवाना व नोंदणीची आकडेवारी (फेब्रु.-मार्च)
जिल्हा परवाना नोंदणी
पुणे २,२४६ ३,८०७
सातारा ३३२ ५५०
सांगली ४० ४४९
सोलापूर १४१ ६७८
कोल्हापूर ११७ १,३६८
एकूण २,८७६ ६,८५२