पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा प्रोफेशनल चोरट्या पुण्यात जेरबंद; २४ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:34 PM2017-11-25T18:34:30+5:302017-11-25T18:37:02+5:30
पोलिसांच्याही नाकीनऊ आणणाऱ्या या अंगठेबहाद्दर व्यावसायिक चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १२ घरफोड्या उघड झाल्या असून, २४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पुणे : चोरी आणि घरफोडीसारखी कृत्ये बहुतेकदा रात्रीच होतात, असे मानले जाते. एका बहाद्दराने चोरीसाठी चक्क दिवसाची वेळ निवडली. नियमित कामाला जावे या प्रमाणे घरुन निघताना बस, सहा आसनी रिक्षा अशा वाहनांचा वापर करीत तो कात्रज-वारजे परिसरात येऊन घरफोडी करुन निघून जायचा! पोलिसांच्याही नाकीनऊ आणणाऱ्या या अंगठेबहाद्दर व्यावसायिक चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १२ घरफोड्या उघड झाल्या असून, २४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (वय २७, रा. रामनगर, पेरणेफाटा, भिमा कोरेगाव) असे त्या चोरट्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून धायरी, वारजे या परिसरातील घरफोडीच्या प्रकरणांत वाढ झाली होती. विशेष म्हणजे या चोऱ्या दिवसा होत होत्या. त्यामुळे पोलिसांसमोर देखील आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी घरफोडी झालेल्या आजुबाजुच्या सोसायट्या आणि दुकानांबाहेर बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावरुन संशयित व्यक्ती निश्चित केला. त्यानुसार त्याचा माग काढत त्याला धायरीतून २३ नोव्हेंबरला अटक केली. न्यायालयाने त्याला ८ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोसले हा घरापासून विश्रांतवाडीपर्यंत सहा आसनी रिक्षाने येत होता. त्यानंतर बसने कात्रजला उतरत होता. त्यानंतर पायीच तो कुलुपबंद घरे हुडूकन काढत. पोपट पाना आणि कटावनीने घराचे कुलुप तोडून सोने आणि रोख रक्कम घेऊन अर्ध्या तासात तो पलायन करीत होता. त्याने १२ घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घरफोड्यांत ९७१ ग्रॅम सोने, ९०० ग्रॅमहून अधिक चांदी आणि सव्वालाख रुपये रोकड चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. त्या पैकी त्याच्याकडून ७८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा २४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. भारती विद्यापीठ, अलंकार आणि वारजे परिसरात त्याने आणखी घरफोडी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
भोसले याच्यावर कोथरुड, निगडी, चिंचवड, येरवडा, विश्रांतवाडी, निगडी या भागात १० गुन्हे दाखल आहेत. या पूर्वी त्याला २००९मध्ये अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक बबन खोडदे, गिरीष सोनवणे, संतोष सावंत यांच्या पथकाने ही कारवाई