फाईव्ह स्टार हाॅटेलमधील स्विमिंग टँकमध्ये बुडून प्राध्यापकाचा मृत्यू, पुण्यातील घटना
By नम्रता फडणीस | Published: October 10, 2023 03:36 PM2023-10-10T15:36:14+5:302023-10-10T15:37:11+5:30
हाॅटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...
पुणे : कोलकत्याहून पुण्यात सीएच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका प्राध्यापकाचा एका पंचतारांकित हाॅटेलमधील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जलतरण तलावातील जीवरक्षक, तसेच तारांकित हाॅटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोहित प्रमोद आगरवाल (वय ३५, रा. बी. के. पाॅल ॲव्हेन्यू, कोलकाता, पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याबाबत अमर संतोष मनका (वय ३४, खराडी, नगर रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेशखिंड रस्त्यावरील पंचतारांकित हाॅटेलचे व्यवस्थापन, जलतरण तलावातील जीवरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित आगरवाल हे सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कोलकात्याहून ते पुण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. एका संस्थेत त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हाॅटेलच्या जलतरण तलावात ते पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी आगरवाल बुडाले. दुर्घटना घडली तेव्हा जलतरण तलाव परिसरात जीवरक्षक उपस्थित नव्हते.
आगरवाल जलतरण तलावात बुडाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना पाण्यातून जीवरक्षकांनी बाहेर काढले. हाॅटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाजीराव नाईक यांनी दिली.