साहित्य अकादमी पुरस्कारासाठी पुण्यातील प्रा. शैलजा बापट यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 10:26 PM2018-12-05T22:26:53+5:302018-12-05T22:27:50+5:30
साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.
पुणे : साहित्य अकादमीतर्फे अभिजात वाडमय आणि संशोधनपर लेखनासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी संस्कृत भाषा-वाडमयाच्या तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा.शैलजा बापट यांची निवड झाली आहे. एक लाख रुपए, ताम्रपट आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ’ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ या संशोधनपर ग्रंथासाठी 2017-18 या वर्षीच्या
साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. अनेक हस्तलिखितांचा अभ्यासातून बापट यांनी ‘ब्रह्मसूत्र’ या ग्रंथांची तीन खंडांमध्ये निर्मिती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संस्कृत विषयाचे अध्यापन करण्याबरोबरच विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. 2009 मध्ये त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) शिष्यवृत्ती मिळाली होती. बापट यांनी शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांत याविषयावरही पुस्तके लिहिली आहेत. आजवर केलेल्या कामाची दखल घेतल्यामुळे या पुरस्काराचे महत्व खूप आहे, या कामामुळे महानुभव आणि मराठी भाषेकडे वळले असल्याची भावना प्रा.शैलजा बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 1998 साली पुणे विद्यापीठात कार्यरत असताना ‘ब्रम्हसूत्र’ प्रकल्पाचे काम हाती घेतले. न्यू भारतीय बुक कापोर्रेशन या संस्थेने तीन खंडामध्ये आणि इंग्रजी भाषेत हा ग्रंथ 2011 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ब्रह्मसूत्र हे वेदांत तत्वज्ञानाचे मुलभूत सूत्रवाडमय आहे. उपनिषदे, ब्रम्हसूत्र आणि भगवदगीता ही तिन्ही वेदांतदर्शनाची मुख्य प्रस्थाने आहेत. ब्रम्हसूत्रांचा मूळ पाठ कोणता हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आद्य शंकराचार्य यांच्यासह दहा आचार्यांचे भाष्य ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.