प्राध्यापक दाम्पत्यास लुटले
By admin | Published: November 20, 2015 03:22 AM2015-11-20T03:22:06+5:302015-11-20T03:22:06+5:30
तीन चोरट्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून प्राध्यापक दाम्पत्यास पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८१ हजार रुपयांना लुटले. तळेगावजवळ मुंबई-पुणे महामार्गालगत
तळेगाव दाभाडे : तीन चोरट्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून प्राध्यापक दाम्पत्यास पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८१ हजार रुपयांना लुटले. तळेगावजवळ मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगरावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात डॉ. विजय बळवंत तडके (वय ४८) व सुवर्णा विजय तडके ( वय ४३, रा. कैलास कुटीर हौसिंग सोसायटी, औंध, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अलीकडे घोरावडेश्वर डोंगरावर लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पर्यटक व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात डॉ. विजय तडके यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉ.तडके हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. दीपावलीची सुटी असल्याने मंगळवारी ते सपत्नीक दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर आले होते. मोटार डोंगराच्या पायथ्याला पार्किंग करून ते पायऱ्या चढून डोंगराच्या मध्यभागी आले असता तीन चोरट्यांनी त्यांना अडविले. जवळ काय असेल ते काढून द्या, असे ते हिंदीतून बोलत होते. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताच त्यातील एकाने विजय तडके यांच्या मानेवर लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. त्यात ते खाली कोसळले. दांडक्याचा प्रहार इतका जोरात होता की, त्यात ते बेशुद्ध पडले. त्यानंतर चोरट्यांनी काही कळायच्या आत सुवर्णा तडके यांच्या डोक्यावर व पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. सोन्याचे पाच तोळ्यांचे दागिने, दोन मोबाईल संच, एटीएम कार्ड, पाकीट असा ८१ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केले.(वार्ताहर)
चोरटे हे १८ ते २२ वयोगटातील असून, सडपातळ आहेत. रंग सावळा, उंची मध्यम असून, ते हिंदीत बोलत होते. त्यातील एकाच्या कानात बाळी आहे. एका चोरट्याने सॅँडो बनियन घातली असून, दोघांच्या अंगात पँट व शर्ट आहे. दरम्यान, तडके दाम्पत्याला डिस्चार्ज दिला असून, चोरट्यांना पकडण्यात लवकरच यश येईल, असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.