प्राध्यापक करणार स्वत:चेच तोंड काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:44+5:302021-09-02T04:20:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : पुणे : “प्राध्यापक भरती तत्काळ उठवावी व विनाअट शंभर टक्के प्राध्यापक भरती सुरू करवी; अन्यथा ...
लोकमत न्यूज नेटवर्क :
पुणे : “प्राध्यापक भरती तत्काळ उठवावी व विनाअट शंभर टक्के प्राध्यापक भरती सुरू करवी; अन्यथा आंदोलनकर्त्यांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी,” अशी मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केली आहे. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्वत:च्या तोंडाला काळे फासून शिक्षक दिनी शासनाचा प्रतीकात्मक निषेध करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी गेल्या ४३ दिवसांपासून महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण केले जात आहे. मात्र, उच्च शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीबाबत वेळोवेळी केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. वित्त विभागाने भरतीस नकार दर्शविला. त्यामुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली आहे. महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या आंदोलनाची उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून योग्य दखल घेतली गेली नाही. त्यांनी चर्चेचा फार्स करून पात्रताधारक उमेदवारांची दिशाभूल केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ३ वेळा शिष्टमंडळाने भेट घेतली, मात्र त्यांनीही आंदोलनकर्त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे संघटनेतर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शिक्षकांना पदभरतीच्या मागणीसाठी ४३ दिवस आंदोलन करावे लागते, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मात्र, आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने येत्या ५ सप्टेंबरला पात्रताधारक शिक्षक स्वत:चे तोंड काळे करून शिक्षक दिन साजरा करणार आहेत. शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद व ढोल वाजवून आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर ६ सप्टेंबरपासून साखळी उपोषणाऐवजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे, असे संघटनेचे पदाधिकारी डॉ. संदीप पाथ्रीकर कळविले आहे.