प्राध्यापकांना घ्यावे लागणार अध्यापनाचे धडे; तंत्रशिक्षणचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:39 PM2017-10-14T17:39:50+5:302017-10-14T17:44:09+5:30
अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे
पुणे : अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राध्यापक होण्यासाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन घातले जाणार आहे. चालु शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरूवात केली जाणार आहे.
तंत्रशिक्षण परिषदेकडून महाविद्यालये, संस्थांमधील प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकासह पुढील पदांवर रूजु होणार्या अनेक प्राध्यापकांना अध्यापनाचे फारसे ज्ञान नसते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, समन्वय राखणे, आवश्यक सामान्य ज्ञान हेही अनेकांना तितकेसे अवगत नसते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अध्यापनाचा दर्जा खालवण्याबरोबरच पदविका, पदवी घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होता. या बाबींचा विचार करून परिषदेने त्यासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षकांना डी. एड., बी. एड. हे अध्यापनाची पदवी किंवा पदविका असणे बंधनकारक असते. अध्यापनासह आवश्यक बाबींचे शिक्षण यामध्ये दिले जाते. त्यानुसार तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीही सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, नव्याने प्राध्यापक म्हणून येणारे आणि सध्या प्राध्यापक असलेल्या सर्वांसाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणे प्रत्येकासाठी बंधनकारक असेल. दोन-दोन महिन्यांचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. नवीन प्राध्यापकांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय रूजू होता येणार नाही. तर जुन्यांना चार-पाच वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी याचा फायदा होईल. त्यानुसार त्याची रचना करण्यात आली आहे. ‘फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम’ या नावाचा हा अभ्यासक्रम असून चालु शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, असे सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट केले.