सावित्रीच्या लेकीचा मक्तेदारीला छेद, वाहनदुरुस्ती व पंक्चर काढण्याच्या कामामध्ये निपुणता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:42 AM2018-03-09T05:42:30+5:302018-03-09T05:42:30+5:30
वाहनांचे पंक्चर काढायचे म्हटले की आपल्या ताकदवान पुरुषाचे रूप आठवते. मात्र, या व्यवसायातील पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत वेल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने आपला ठसा उमटवला आहे.
वेल्हे - वाहनांचे पंक्चर काढायचे म्हटले की आपल्या ताकदवान पुरुषाचे रूप आठवते. मात्र, या व्यवसायातील पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत वेल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने आपला ठसा उमटवला आहे. मागील दहा वर्षांपासून सायकलपासून थेट ट्रक, जेसीबीपर्यंतच्या वाहनांचे पंक्चर्स काढण्यात निर्मला अनंता खोपडे या४२ वर्षीय महिला कुठेही मागे नाहीत.
खोपडे या मुळच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या चºहाटवाडी येथील रहिवासी आहेत. कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी पती अनंता खोपडे यांनी २० वर्षांपूर्वी वेल्हे येथे पंक्चरचे दुकान टाकले. त्यांना एक मुलगा व दोन मुली असून खर्च व जबाबदाºया वाढल्या. दुकानात कामगार ठेवण्याऐवजी निर्मला यांनी स्वत: कामात मदत करायला सुरुवात केली. १० वर्षांपासून त्यांनी या कामात स्वत:ला वाहून घेतले आहे. सर्व प्रकारच्या मोटारसायकलींच्या टायर्सचे पंक्चर काढणे, कार वॉशिंग, सोबत ट्रॅक्टर, जेसीबी यांसारख्या अवजड वाहनांचे पंक्चर काढणे ही कामे त्या करतात.
कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. एक महिला असे जड काम करताना पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. त्यांनी ग्रा. पं. सदस्यपदही भूषविले आहे. आॅईल बदली, ब्रेक पॅड, लाईनर बदलणे, ट्युब- टायर बदलणे, काबोर्रेटर साफ करुन देणे आणि किरकोळ दुरुस्ती त्या लीलया करतात. या कामातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांपुढे उदाहरण उभे केले आहे.
त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. थोडीशी भातशेती आहे. या व्यवसायातून दोन्ही मुलींना उच्च शिक्षणाचा मार्ग दिला आहे. मोठी मुलगी प्रणाली सिव्हिल इंजीनियरिंगचे तर दुसरी प्रतीक्षा बी.एस्सी. अॅग्रीच्या अभ्यासक्रमाला शिकत आहे. या कामात प्रतीक्षादेखील आईला मदत करते. तिलाही त्यांनी पंक्चर काढायला शिकविले आहे. मुलांना आपल्या आईचा अभिमान वाटत असून हे सन्मानाचे जगणे आहे असे वाटते.
सुरुवातीला हे काम करताना थोडासा संकोच वाटत होता. लोक काय म्हणतील याची भीती वाटायची. मात्र एक वेगळेच काम की ज्यामधे महिलांचा कधी हात लागला नाही असे गाड्या पंक्चर काढणे, दुरुस्ती करण्याचे काम मला करता येऊ लागल्याने मला आनंद वाटला. माझे पती अनंता खोपडे यांनी मला हे सर्व काम शिकविले. माझे माहेर पुण्यात शुक्रवार पेठेत असून १० वीपर्यंत शिक्षण पुण्यात झाले आहे. वडिलांकडे असताना असे शारीरिक कष्ट कधी केले नाही. परंतु मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी मी स्वत: चाकांना हात लावला.