माझ्या फेसबुक पोस्टवर खोडसाळपणे कमेंट करणाऱ्यांचे प्रोफाईल लॉक होतील; वसंत मोरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:04 PM2022-05-06T12:04:01+5:302022-05-06T12:06:31+5:30
शहराध्यक्ष पद सोडल्यानंतर अनेक अतृप्त आत्म्यांना मला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यच कामाला लागले आहे. त्यांचा ३ तारखेचा अल्टिमेटम त्यानंतर ४ तारखेचे आंदोलन याचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत.
तसेच काही भागात त्यांच्याकसून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याच्या चर्चाना उधाण आले होते. आता अनेक दिवसांनी वसंत मोरे माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी लोकमाशी बोलताना फेसबुक पोस्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मोरे म्हणाले, मी शहराध्यक्ष पद सोडल्यानंतर अनेक अतृप्त आत्म्यांना मला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. मी आधीपासूनच राज साहेबांबरोबर होतो. आणि शेवटपर्यंत राहणार आहे. मी नेहमी माझ्या फेसबुक पोस्ट मधून कुठल्याही गोष्टीबाबत स्पष्टीकरण देत असतो. मागील महिनाभरात माझ्या पोस्ट वर कोणीतरी जाणूनबुजून खोडसाळपणाच्या कमेंट करत आहेत. मी स्वतः फेसबुक पोस्ट टाकतो. त्यावर आलेल्या कमेंट पाहत असतो. माझ्या १०० कार्यकर्त्यांची सोशल मीडिया टीम आहे. मी जर त्यांना सांगितलं तर तेही कमेंट दयायला सुरुवात करतील. त्यामुळे कमेंट करणाऱ्यांचे प्रोफाइल लॉक होतील म्हणून माझ्या कुठल्याही पोस्टवर खोडसाळपणे कमेंट करण थांबवावे.
प्रत्यक्ष मैदानात नसलो तरी काम करत राहणार
माझ्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी कुठंही भूमिका घेतली नाही. तसेच कुठल्याही बाहेरच्या नेत्याला ते परवडणार नाही. मी १५ वर्षे नगरसेवक आहे. १३ वर्षे मी पक्षाला उभारी देण्याचं काम केल आहे. ज्या दिवशी अध्यक्ष पदासाठी बाजूला झालो. त्यानंतर मी प्रभागातील पाहण्याचे सुरुवात केली. मी जरी प्रत्यक्षात मैदानात नसलो पक्षाचं काम करत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.