फ्लॉवरमधून पावणेतीन लाखांचा नफा

By admin | Published: May 1, 2017 02:03 AM2017-05-01T02:03:43+5:302017-05-01T02:03:43+5:30

अडीच एकर क्षेत्रांत फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन लांडेवाडी येथील शेतकरी रखमाजी सहादू शेवाळे या शेतकऱ्याने घेतले आहे.

Profit from Lakhs of Flowers | फ्लॉवरमधून पावणेतीन लाखांचा नफा

फ्लॉवरमधून पावणेतीन लाखांचा नफा

Next

विलास शेटे/मंचर
अडीच एकर क्षेत्रांत फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन लांडेवाडी येथील शेतकरी रखमाजी सहादू शेवाळे या शेतकऱ्याने घेतले आहे. आतापर्यंत ५०० क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी नेला आहे. १० किलोस ८० ते १२० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा शेतकरी शेवाळे यांना मिळाला आहे.
लांडेवाडी येथील शेतकरी रखमाजी सहादू शेवाळे हे शेतात नगदी पिकाचे उत्पादन घेत असतात. चिंचोडी रस्त्यालगत त्यांची शेती असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी फ्लॉवर पिकाची लागवड केली. तत्पूर्वी शेतात त्यांनी गादी वाफे बनवून रोपे टाकण्यात आली. ४५ हजार रोपांची लागवड सरीवर व वाफ्यावर करण्यात आली. वातावरणात वारंवार बदल होत असल्याने चार वेळा औषध फवारणी केली. सुरुवातीस शेणखत टाकण्यात आले. त्यानंतर १०:२६:२६,१८:४६ व युरिया खताची मात्रा देण्यात आली.
२ वेळा खुरपणी केली. घरातील माणसे तसेच मजुरीवर खुरपणी करण्यात आली. विशेष काळजी घेतल्याने फ्लॉवर पीक जोमदार आले. फ्लॉवरचा गड्डा मोठा तसेच सफेद होता. रोगांचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. फ्लॉवर पिकाची काढणी सुरू झाली. शेती रस्त्यालगत असल्याने शेतातील फ्लॉवरची तोडणी करून माल वाहनात भरून तो थेट बाजारात पाठविला जाऊ लागला.

५०० क्विंटल मालाचे उत्पादन
स्थानिक मंचर बाजारात फ्लॉवर विक्रीसाठी पाठविण्यात आली. तसेच काही माल मॉलला पुरविण्यात आला. एकूण ११०० डाग उत्पादन निघाले. म्हणजेच सुमारे ५०० क्विंटल मालाचे उत्पादन निघाले. मंचर बाजारात ८० ते १२० रुपये १० किलोस दर मिळाला.
मॉलमध्ये १० किलोस १४० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. आतापर्यंत फ्लॉवर पिकातून ४ लाख रुपयांचे उत्पादन निघाले आहे. सव्वा लाख रुपये भांडवली खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे.
शेतकरी रखमाजी शेवाळे यांना किरण शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या शेतातील फ्लॉवर पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेटी देऊ लागले आहेत.

Web Title: Profit from Lakhs of Flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.