५१ गुंठे क्षेत्रांत ‘स्वीटकॉर्न’मधून साधली प्रगती
By admin | Published: March 27, 2017 02:12 AM2017-03-27T02:12:08+5:302017-03-27T02:12:08+5:30
गदी पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील महेश अर्जुन डोके या तरुण शेतकऱ्याने
विकास शेटे /मंचर
गदी पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील महेश अर्जुन डोके या तरुण शेतकऱ्याने ५१ गुंठे क्षेत्रात स्वीटकॉर्न मका पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. मकापिकातून डोके यांना चांगले उत्पादन निघाले. १३० कट्टे उत्पादन निघाले असून मकेच्या ताटांचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी झाला. मकेची ताटे विकून त्यातून त्यांनी चांगलेच पैसे मिळविले. याच शेतात डोके पुन्हा स्वीटकॉर्न मकापीक घेणार आहेत.
वडगाव काशिंबेग येथील महेश अर्जुन डोके यांची वडगाव काशिंबेग तसेच सुलतानपूर या दोन गावांमध्ये शेती आहे. बाराही महिने पाण्याची व्यवस्था असल्याने व दोन्ही गावांजवळ घोडनदी गेल्याने वर्षभर नगदी पिके घेतली जातात. नोकरी करुन शेती करणाऱ्या डोके यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन विविध प्रकारची पिके घेतली आहेत. मात्र मागील वर्षी नगदी पिकांना बाजारभाव मिळाला नाही. अनेक पिकांचे भांडवल वसूल झाले नाही. त्यामुळे कमी खर्चात येणारी पिके घेण्याचा निर्णय डोके यांनी घेतला. सुलतानपूर येथील डोंगरावरची वावरं ही शेती नगदी पिकांसाठी उपयुक्त समजली जाते. या शेतीत ५१ गुंठे शेतात स्वीटकॉर्न मका पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सुरुवातीला श्ेतात शेणखत टाकण्यात आले. दोन किलोचे दोन मका बी पुडे आणले. त्यासाठी ४६०८ रुपये खर्च आला. लागवडीनंतर वेळेवर पाणी भरणी करण्यात आली. भेसळ खताचा डोस देण्यात आला. तणनाशक मारले, मका पीक जोमदार आले. मका काढणीच्या वेळी कणीस फुगवणीसाठी पोटॅश व युरिया यांचा डोस देण्यात आला. मकापीक तिन महिन्यात निघते. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे डोके यांच्या मकापिकाच्या उत्पादनासाठी जास्त दिवस लागले. उत्पानाला काहीसा उशीर होऊन ११२ दिवसात हे पीक निघाले.
स्वीटकॉर्न मका पिकाला भांडवल कमी लागते तसेच मजुरी वाचत असल्याने शेतकऱ्यांना हे पीक परवडते. मका कणसांची तोडणी झाल्यावर शेतात शिल्लक राहिलेली मका ताटे विकण्यात आली. जनावरांच्या खाद्यासाठी या मके ताटांना चांगली मागणी होती. डोके यांची ताटे विकून त्यातूनही पैसे मिळविले. मका पिकाचे यशस्वी उत्पादन शेतकरी महेश डोके यांनी घेतले. वडील अर्जुन डोके, पत्नी छाया डोके, यांनी पीक घेण्यासाठी विशेष मदत केली. मका पीक काढून झाले असून याच ठिकाणी पुन्हा स्वीटकॉर्न मका पीकशेतकरी घेणार आहेत.