महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 01:48 PM2021-01-21T13:48:52+5:302021-01-21T13:49:51+5:30

प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे.

The progress of Maharashtra must be continued by the youth: Urmila Matondkar | महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर

महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर

Next
ठळक मुद्दे प्रबोधन शतकोत्सव महोत्सवाचे उदघाटन

पुणे : 'प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. आयुष्य कधीतरी सुवर्णसंधी देते, तर कधी निराशेच्या गर्तेत फेकते. यातून बाहेर कसे पडायचे, हे 'माझी जीवनगाथा' शिकवते.  वैचारिक गुलामगिरी अजूनही पूर्णत: संपलेली नाही. प्रबोधन या शब्दाचा अर्थ आज दुर्देवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उदबोधन म्हणजे प्रबोधन. यातून होणारी क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असते. प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल', असे विचार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया आणि सीमा चोरडिया, संवाद पुणेचे सुनील महाजन, सचिन ईटकर, निकिता मोघे, किरण साळी, हरीश केंची आदी उपस्थित होते.

बाबा आढाव म्हणाले, 'विचारांच्या धाग्यांनी समाजाच्या विचारांची बांधणी होत असते. फुले-शाहू-आंबेडकर, सावित्रीच्या लेकी हे धागे म्हणजे एक विचारधारा आहे. विचारधारेतील धागे काळाच्या ओघात सुटता कामा नयेत. सध्याच्या काळात सुधारणेची चळवळ मागे का पडली आहे, याचा समाजाने विचार करायला हवा.  त्यासाठी प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे. प्रबोधनकार हे सत्यशोधक होते.' सरस्वतीवंदन करायचे, मग महात्मा फुले यांची प्रार्थना का नाही म्हणायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'शिवसेनेचे हिंदुत्त्व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करणारे नाही; ते हिंदुत्त्व प्रबोधनकारी आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार जाजवल्य आणि प्रखर होते. आजही त्यांच्या विचारांना विविध प्रकारे धुमारे फुटत असतात, अप्रत्यक्ष प्रबोधन विविध मार्गानी होत असते. इतिहासातील नोंदींची धूळ झटकली गेली पाहिजे.
प्रबोधनाच्या जाणिवांचा नवा हुंकार निर्माण होण्याची गरज आहे.'

'स्वेच्छा विवाहाचा विषय अजूनही आपल्या समाजाने स्वीकारलेला नाही. त्यातून ऑनर किलिंगच्या भयानक घटना घडतात. जातपंचायतीच्या नावाखाली अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा ओळखायला हवी. डिजिटल युगात अंधश्रद्धा, जातीयता नव्या मुखवट्यातून परत समोर येत आहेत. त्याचा सामना विचारांच्या आधाराने करायला हवा', याकडेही गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.

Web Title: The progress of Maharashtra must be continued by the youth: Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.