प्रभागांचे प्रगतिपुस्तक होतंय तयार
By Admin | Published: November 16, 2015 02:03 AM2015-11-16T02:03:08+5:302015-11-16T02:03:08+5:30
शहरातील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्येची घनता, त्यांना महापालिकेकडून मिळणाऱ्या घनकचरा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सुविधांची स्थिती याचा आढावा घेतला जात आहे.
दीपक जाधव, पुणे
शहरातील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्येची घनता, त्यांना महापालिकेकडून मिळणाऱ्या घनकचरा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सुविधांची स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. त्याचबरोबर इतर महापालिकांशी त्याचा तुलनात्मक अभ्यास करून प्रभागांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते महापालिकेकडे सादर केले जाणार आहे. यामुळे प्रभागांमध्ये नेमक्या कोणत्या सुविधांचा वानवा आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे.
महापालिका व पर्यावरण शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम केले जात आहे. प्रत्येक शहराच्या गरजा वेगळ्या असतात, त्यासाठी त्यांचा स्वतंत्र इंडेक्स तयार होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर पुण्याचा इंडेक्स तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्यावरण शिक्षण केंद्र व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची टीम गेल्या ३ महिन्यांपासून यावर काम करीत आहे. केंद्र शासनाकडून विकसित केल्या जाणाऱ्या १०० स्मार्ट शहरांमध्ये पुण्याची निवड झाली आहे, त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश होण्यासाठी पुणे महापालिकेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास सुरू झाल्यास प्रगतिपुस्तकातील माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रभागामध्ये कचरा उचलण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाते का, पाण्याचा पुरवठा सुरळीत व पुरेसा होतो का, कोणत्या भागांमध्ये पाणी कमी मिळण्याच्या तक्रारी आहेत, प्रभागामध्ये किती शिक्षणसंस्था, दवाखाने आहेत, महापालिकेने बांधलेले रस्ते, फुटपाथ, सायकल ट्रॅक, उद्याने यांची स्थिती कशी आहे, झोपडपट्ट्यांची काय परिस्थिती आहे, प्रभागामध्ये मोकळ्या जागा किती उपलब्ध आहेत, त्यांची मालकी कोणाकडे आहे. नागरी सुविधा केंद्र उपलब्ध आहेत का, तेथून चांगली सेवा मिळते का याची माहिती गोळा केली जाते आहे. प्रभागांमधून गोळा झालेल्या या माहितीच्या आधारे शहरातील विविध प्रभागांतील सुविधांचा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे.
एखाद्या प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या कमी प्रमाणात आढळून आल्यास त्यांनी कचरा प्रश्नावर कशापद्धतीने तोडगा काढला याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रभागांमध्ये इतरही चांगल्या बाबी आढळून आल्यास त्याचीही नोंद घेतली जाणार आहे. त्याकरिता प्रभागाचे नगरसेवक, नागरिक यांचा सहभाग कसा राहिला याचा आढावा घेतला जाणार आहे. या माहितीची इतर शहरांतील सुविधांशी तुलना केली जाणार आहे. त्यानुसार प्रभागामध्ये काय सुधारणा करता येणे शक्य आहे याच्या सूचना केल्या जाणार आहेत.