कुणी देशभक्ती तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले : अभिराम भडकमकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:52 PM2018-10-17T20:52:20+5:302018-10-17T20:55:34+5:30
शिक्के मारण्याची प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे. लेखक म्हणून ही गोष्ट मला फार अस्वस्थ करते.....
पुणे : सध्याच्या काळात आपण ग्रे शेड्स मान्य करेनासेच झालो आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टी काळ्या किंवा पांढ-या बघायची सवय लागली आहे. तुमच्याकडे एकतर मोदीभक्त किंवा द्वेष्टे म्हणून बघितले जाते. तुम्ही पुरोगामी तरी असता किंवा प्रतिगामी तरी असता. पण असं असूच शकत नाही. हे सगळे शब्द अतिशय स्वस्त झाले आहेत. कुणी देशभक्ती स्वस्त केली तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले. त्यामुळे आज कलावंताने ठामपणे उभे राहून सांगायची गरज आहे की आम्हाला कुणाकडूनच सर्टिफिकेट नको आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर यांनी समाजातील व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबददल अभिराम भडकमकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (आयपार) या संस्थेतर्फे करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी भडकमकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. रामगोपाल बजाज, ज्येष्ठ नाट्यचित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक किरण यज्ञोपवीत, आयपारचे संस्थापक संचालक आणि नाट्यदिग्दर्शक प्रसाद वनारसे उपस्थित होते.
अभिराम भडकमकर यांनी विविध एकांकिका, नाटके, चित्रपट तसेच कादंब-या लिहिलेल्या आहेत.या लेखनप्रक्रियेविषयी बोलताना भडकमकर म्हणाले, आम्हाला लिहायचा अधिकार आहे आणि आम्ही लिहिणार असे सांगायची गरज आहे. शिक्के मारण्याची ही प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे. लेखक म्हणून ही गोष्ट मला फार अस्वस्थ करते.
डॉ. श्यामला वनारसे यांनी भडकमकर यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेतला. ‘एका बाजूला वाहतो ही दुर्वांची जुडी’ किंवा ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ यासारखी व्यावसायिक नाटके आणि दुस-या बाजूला संयत अभिनय शैली असलेली वास्तववादी-प्रायोगिक नाटके यांच्यामध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. आणि या तणावाचे निरसन कसे करायचे हा प्रश्न अभिराम भडकमकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवला. बदलत्या समाजातल्या नवीन विचार करू शकणा-या माणसांना जे प्रश्न वारंवार पडत होते त्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणून त्यांना स्वत:चा निर्णय घ्यायला मदत करण्याचं काम भडकमकरांच्या नाटकांनी गंभीरपणे आणि प्रभावीपणे केले असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रा. रामगोपाल बजाज म्हणाले, मी अभिरामचा शिक्षक होतो. त्यावेळी अभिराम विद्यार्थीदशेतच एक नाटककार, अभिनेता, विचारी असल्याचं आम्हां सर्वांच्या लक्षात आलं होतं. आज माज्या या गुणी विद्याथ्यार्चा सत्कार करताना मला स्वत:चाच गौरव झाल्यासारखं वाटतं आहे. प्रसाद वनारसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.