"पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा" कालीचरण बाबाविरोधात पुण्यात आंदोलन
By निलेश राऊत | Published: May 31, 2024 01:01 PM2024-05-31T13:01:35+5:302024-05-31T13:01:59+5:30
पुणे : स्वतःला धार्मिक गुरू म्हणवणारा भोंदू बाबा कालीचरण याने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम ...
पुणे : स्वतःला धार्मिक गुरू म्हणवणारा भोंदू बाबा कालीचरण याने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम महिलांचा अपमान केला आहे. असा आरोप करीत कालीचरणचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (शरद पवार गट) शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
"जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या" हे या भोंदू बाबाचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणं अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जात नाही. असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. यावेळी "पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा", "समाजाला धोका, कालीचरणला ठोका" अशा घोषणा देण्यात आल्या.
अभिनव कला महाविद्यालय चौक, टिळक रस्ता येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष जगताप यांच्यासह किशोर कांबळे, गणेश नलावडे, सारिका पारेख, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, तनया साळुंके, पायल चव्हाण, श्रधा जाधव, ऋतुजा देशमुख, मनीषा भोसले, दीपक जगताप, नितीन जाधव, ज्योती सूर्यवंशी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.