झाडांवरील जाहिरातींना लगाम
By admin | Published: August 2, 2015 04:37 AM2015-08-02T04:37:20+5:302015-08-02T04:37:20+5:30
शहरातील झाडांवर खिळे ठोकून केलेल्या जाहिराती, सार्वजनिक स्वच्छतांच्या आतील आणि बाहेरील बाजूच्या भिंती, पीएमपीने नव्याने उभारलेले स्टिलचे बसथांबे, पीएमपीच्या बसवर बेसुमार
पुणे : शहरातील झाडांवर खिळे ठोकून केलेल्या जाहिराती, सार्वजनिक स्वच्छतांच्या आतील आणि बाहेरील बाजूच्या भिंती, पीएमपीने नव्याने उभारलेले स्टिलचे बसथांबे, पीएमपीच्या बसवर बेसुमार पद्धतीने लावल्या जात असलेल्या भित्ती पत्रकांमध्ये शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाल्यानंतर उशिरा का होईना पण जागे झालेल्या महापालिकेने या अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही जाहिरातबाजी करण्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्यावर थेट शहर विद्रूपीकरणा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश शनिवारी दिली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या संदर्भात महापौर धनकवडे म्हणाले, की शहरात सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातींची भित्तिपत्रके लावण्यात आले आहेत. त्यात दवाखान्यांपासून, खासगी शिकवण्या, नोकरीविषयक जाहिरातींचा समावेश आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शहराचे विद्रूपीकरण होत आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक शौचालये, शासकीय आणि निमशासकीय खासगी इमारती, महापालिकांच्या इमारतींच्या भिंती, बसगाड्या, बसस्टॉपवर अनेक भित्तिपत्रके लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच महापालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसानही होत असल्याने प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या भित्तिपत्रक लावणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे धनकवडे म्हणाले.