१ कोटी १९ लाख रुपयांची प्रतिबंधित दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By नितीश गोवंडे | Published: November 2, 2023 03:41 PM2023-11-02T15:41:17+5:302023-11-02T15:41:28+5:30
मुंबई - बंगळुरू महामार्गावर रावेत भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५ लाखांच्या ४३ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या
पुणे : विदेशी आणि फक्त गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेल्या विदेशी दारूचा ट्रक पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. मुंबई - बंगळुरू महामार्गावर रावेत भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५ लाखांच्या ४३ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कुणाला संशय येवू नये म्हणून आरोपींनी ट्रकच्या पाठीमागे जनावरांचे खाद्य असलेल्या गोण्या टाकून पुढील बाजूला हा मुद्देमाल ठेवला होता. पुष्पा स्टाईल सुरू असलेली ही वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून दोघांना अटक करत १ कोटी १९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
विजय चंद्रकांत चव्हाण (५३, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (३१, रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी ट्रकमधून रॉयल ब्लू व्हिस्की, मॅजिक ऑरेंज, रॉयल ब्लंक, व्होडका या विदेशी मद्याची वाहतूक करत होते. उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान मुंबई - बंगळुरू महामार्गावरून संशयीतरित्या ट्रक जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून रावेत भागात ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे खतांच्या गोण्या आढळून आल्या. मात्र, गोण्याच्या आतमध्ये छुप्या पद्धतीने दारूचे बॉक्स ठेवल्याचे पथकाला दिसून आले. त्यानूसार पथकाने ट्रकची झडती घेतली असता आतमध्ये ऑरेंज मॅजिक, रॉयल ब्लू व्हिस्कीचे ४३१ बॉक्स, अॅपल व्होडकाचे ७८५ बॉक्स, किंगफिशरचे ४० बॉक्स मिळून जवळपास ४३ हजार बाटल्या आढळून आल्या. आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानूसार पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली. ट्रकमधून मुंबईकडे ही दारू नेण्यात येणार होती, असे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक युवराज शिंदे, एस. आर. पाटील, निरीक्षक दिपक सुपे, प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, अशिष जाधव, सागर धुर्वे, डी. के. पाटील, अतुल बारगळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर, अंकुश कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.