शंभर मीटरच्या आवारात मोबाइल वापरास बंदी; मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
By नितीश गोवंडे | Updated: May 12, 2024 16:26 IST2024-05-12T16:25:39+5:302024-05-12T16:26:08+5:30
मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह, त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहणार

शंभर मीटरच्या आवारात मोबाइल वापरास बंदी; मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान उद्या (ता. १३) पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार १८ मतदान केंद्रे आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात होतो. पुणे पोलिसांकडून पुणे लोकसभा, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांच्या परिसरात शंभर मीटर परिसरात मोबाइल संचाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्वलनशील वस्तू, शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह, त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.