प्रवाशांना धरले वेठीस, रेल्वे प्रशासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 01:33 AM2018-11-06T01:33:33+5:302018-11-06T01:33:47+5:30
रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाटस रेल्वे स्थानकात पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस तब्बल दीड तास थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची घटना रविवारी (दि. ४) घडली. संतप्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
दौंड - रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाटस रेल्वे स्थानकात पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस तब्बल दीड तास थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची घटना रविवारी (दि. ४) घडली. संतप्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, रेल्वे प्लॅटफार्म मोकळे असतानादेखील प्लॅटफार्म मोकळा नाही याचे कारण सांगून गाडी निर्मनुष्य ठिकाणी थांबविण्याचे प्रकार वाढले आहे.
पुण्यातून आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस ही विशेष गाडी सुटली. गाडी ९ वाजण्याच्या सुमारास पाटस रेल्वे स्थानकात आली. तब्बल दीड ते पावणेदोन तास ही प्रवासी गाडी निर्मनुष्य रेल्वे स्थानकात थांबून होती. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करीत जीव मुठीत धरून बसावे लागले. प्रवाशांनी गाडी का थांबली म्हणून दौंडला संपर्क साधला. त्यानुसार काही पत्रकारांनी स्टेशन मास्टर श्यामवेल किल्प्टन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मार्ग बदललेली गाडी आहे. तेव्हा दैनंदिन गाड्या गेल्याशिवाय ही गाडी सोडता येणार नाही. रेल्वे पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता, पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांनी तातडीने पुणे कंट्रोलसह अन्य ठिकाणी संपर्क साधून प्रवाशांच्या भावना कळविल्या असल्याचे समजते. त्यानंतर सदरची गाडी १0. ३0 ला पाटस रेल्वे स्थानकातून हलविली.
ज्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वेवर सशस्त्र दरोडे पडून प्रवाशांची लूटमार झाल्याची घटना घडली होती, त्या ठिकाणीच ही गाडी थांबविण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचा जीव संकटात ठेवण्यात आल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. निर्मुनष्य ठिकाणी प्रवासी गाड्या थांबविण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रवाशांची लूटमार झाली तर याला जबाबदार नेमके कोण राहील, असा प्रश्न रेल्वे पोलीस प्रशासनातून व्यक्त केला गेला. झाल्या प्रकाराबद्दल रेल्वे पोलिसांनीदेखील नाराजी व्यक्त केली.
स्टेशनमास्टरचा फोन बंद
स्टेशनमास्टर श्यामवेल किल्प्टन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की सदरची रेल्वेगाडी मार्ग बदललेली गाडी आहे. त्यामुळे नियमित गाड्या गेल्याशिवाय पाटस रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाडीला काढता येणार नाही. त्यानंतर दोन ते तीन वेळा पत्रकारांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी फोन बंद करून ठेवला.
प्लॅटफॉर्म मोकळे होते
प्लॅटफॉर्म मोकळे नसल्याचे कारण सांगून पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस पाटस रेल्वे स्थानकात दीड तास थांबविली. त्यानंतर काही पत्रकार स्थानकामध्ये वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेले असता प्लॅटफॉर्म सर्रास मोकळे होते. तेव्हा नेमके काय कारणास्तव गाडी थांबवून प्रवाशांना वेठीस धरले याची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रवाशांतून पुढे आली आहे. रविवारी रात्री पादचारी पुलावरील दोन लिफ्ट बंद अवस्थेत होत्या. त्यामुळे प्रवाशांची विशेषत: वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय झाली.
रविवारी (दि. ४) पुणे-गोरखपूर नवीन विशेष गाडी सुरू झालेली आहे. या गाडीला जर स्टेशन मास्टर श्यामवेल किल्प्टन मार्ग बदललेली गाडी म्हणत असतील तर त्यांचा तो अनभिज्ञपणा आहे. एका जबाबदार स्टेशन मास्टरने चुकीचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे.
-विकास देशपांडे, रेल यात्री संघाचे सचिव