Maharashtra Assembly Election 2024 : भयमूक्त वातावरणातील मतदानासाठी १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By नारायण बडगुजर | Published: November 20, 2024 09:35 AM2024-11-20T09:35:53+5:302024-11-20T09:35:53+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त
पिंपरी : विधानसभा निवडणूक आणि मतदान प्रक्रिया शांततेत, भयमूक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६२८ जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएस) कायद्याच्या विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज झाले असून चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तसेच अवैध धद्यांवर छापे घालून तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवाया करून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर आळा घालण्यात आला. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये एक कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त केली. दारुबंदी अधिनियमानुसार मोठ्या प्रमाणावर छापे घालून एक कोटी १७ लाख रुपयांची दारु जप्त केली. ४९ अग्निशस्त्रे व १०० काडतुसे जप्त केली. ३७ लाख ९३ हजार रुपयांचा गांजा व इतर अंमली पदार्थ जप्त केले. गुन्हेगारीस आळा घालण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएस) कायद्याच्या विविध कलमांखाली १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ प्रमाणे ३४७ जणांवर, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे १३६ लोकांना तडीपार केले. १० गुन्हेगारी टोळ्यांतील ४९ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. ७ आरोपींना स्थानबद्ध केले. ७१ पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली.
..असा आहे पोलिस बंदोबस्त
पोलीस सह आयुक्त : १
अपर आयुक्त : १
उपायुक्त : ६
सहायक आयुक्त : ९
निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक : ३११
पोलिस अंमलदार : ३०९५
होमगार्ड : १०००
एसआरपीएफ कंपनी : २
सीएपीएफ कंपनी : ४
विधानसभा निवडणूक काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे. काही शंका, अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मतदान करताना कोणत्याही मतदारांनी मोबाईल फोन मतदान बूथमध्ये घेऊन जाऊ नये.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड