कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्ष आॅक्टोबरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:48 AM2018-08-24T02:48:16+5:302018-08-24T02:48:42+5:30
काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोग पुण्यामध्ये येत्या ३ ते ६ आॅक्टोबर रोजी साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेणार आहे. काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. यापूर्वी आयोगाने ११ ते १५ मे रोजी शपथपत्राच्या स्वरूपात निवेदने मागविली होती. आयोगानेदेखील कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, वढू बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. नागरिक, पोलीस आणि प्रशासनाकडून अनेक अर्जदेखील झाले आहेत. तसेच, संबंधित चौकशी आणि साक्ष नोंदविण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या मुंबई कार्यालयात आणि ३ ते ६ आॅक्टोबर रोजी पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कार्यालयात होणार आहे. संबंधीत साक्षीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच सुरुवातीस ज्या साक्षीदारांना बोलावण्यात आले आहे, त्यांची नावे आणि सुनावणीची तारीख आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
या शिवाय ज्यांनी आयोगाकडे निवेदने दाखल केली आहेत, त्या संस्था, संघटना अथवा व्यक्तींना सुनावणीला उपस्थित राहता येईल. त्यासाठी त्यांना आयोगाच्या माहिती आयुक्त कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा रस्ता, मुंबई येथील कार्यालयाकडे येत्या ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे लागेल.