दूध उत्पादनातून आणली भरभराट
By admin | Published: November 18, 2016 05:45 AM2016-11-18T05:45:51+5:302016-11-18T05:45:51+5:30
शेतीउत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्याला जोडधंदा म्हणून राजुरी येथील दीपक लक्ष्मण हाडवळे यांनी दूध व्यवसाय निवडला
राजेश कणसे / राजुरी
शेतीउत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्याला जोडधंदा म्हणून राजुरी येथील दीपक लक्ष्मण हाडवळे यांनी दूध व्यवसाय निवडला असून, त्यात चांगले यश आले आहे.
शेती क्षेत्र अतिशय कमी असून त्यातच पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे त्याला जोडधंदा म्हणून काय करावे, या विचारातच दीपक हाडवळे यांनी त्यांच्या पत्नी शीला यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी सुरुवातीला एक चांगल्या प्रकारची जर्सी गाय बँकेतून कर्ज काढून आणली. त्यांनी ती गाय व्याल्यानंतर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. गाईला चांगल्या प्रकारे वेळच्या वेळी खायला घालणे, औषधोपचार करणे आदी गोष्टी नियमित केल्याने दूध उत्पादन वाढले आहे.
आज त्यांच्याकडे सुमारे १६ जर्सी गाई आहेत. यामध्ये खिलारी, गिरी या जातींच्या गार्इंचा समावेश आहे. तर, या गार्इंची सुमारे २० लहान-लहान वासरे आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडून सरासरी १८० लिटर दूध दररोज जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी चांगल्या जातीच्या दोन-तीन म्हशी आणल्या. त्यातही त्यांना चांगले यश मिळाल्याने आज त्यांच्याकडे जवळपास २० म्हशी आहेत.