‘कुंकूमतिलक’नंतर होणाऱ्या पतीचे प्रेमसंबंध उघड; मावळातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
By नारायण बडगुजर | Published: May 4, 2024 04:38 PM2024-05-04T16:38:24+5:302024-05-04T16:43:01+5:30
मावळ तालुक्यातील वराळे येथे गुरुवारी (दि. २) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली...
पिंपरी : ‘कुंकूमतिलक’नंतर वाग्दत्त पतीचे प्रेमसंबंध उघडकीस आले. त्यामुळे आपले आयुष्य बरबाद झाले, असे वाटून घेऊन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील वराळे येथे गुरुवारी (दि. २) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विकास राजाराम धामनकर (३०, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विनायक संभाजी मराठे (३०, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक यांच्या २९ वर्षीय बहिणीचे विकास धामनकर याच्याशी लग्न ठरले होते. त्यांचा १४ एप्रिल २०२४ रोजी कुंकूम तिलकाचा कार्यक्रम देखील झाला होता. त्या कार्यक्रमाचे फोटो विकास याने व्हाटसअप स्टेटसला ठेवले होते. परंतु विकास याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध असताना देखील त्याबाबत फिर्यादी विनायक यांना आणि त्यांची २९ वर्षीय बहीण यांना प्रेमसंबंधांबाबत कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध असतानाही विकास याने विनायक यांच्या बहिणीसोबत कुंकूमतिलकाचा कार्यक्रम केला. त्यानंतर लग्न करायचे नाही, असे विकास याने सांगितले. त्यामुळे विनायक यांच्या बहिणीने वाईट वाटून घेऊन राहत्या घरी खोलीच्या छतास लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.