इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन द्या
By admin | Published: May 9, 2017 03:24 AM2017-05-09T03:24:44+5:302017-05-09T03:24:44+5:30
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटेठाण : कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. एकूण उत्पादनापैकी तीस टक्के शेतमाल वाया जात आहे. यापासून इथेनॉलनिर्मिती चांगली होऊ शकते, म्हणूनच यापासून इथेनॉल तयार केले तर महागड्या पेट्रोलियमवर होणारे हजारो कोटी रुपये वाचण्यास मदत होईल. तीच रक्कम वीज व पाण्यावर खर्च केली तर पाण्याविना पडीक असलेल्या शेतजमिनीतूनदेखील चांगले उत्पादन घेता येईल. इथेनॉलनिर्मिती व वापराबाबत प्रोत्साहन दिल्यास प्रचलित दरापेक्षा स्वस्त दराने इंधन उपलब्ध होऊन सर्वांगीण विकासाला चालना देत नव्या इंधनप्रणालीचा नवा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पाटेठाण (ता. दौंड) येथे प्राज कंपनीनिर्मित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या देशातील दुसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या शेतातील काडीकचरा, तुरीच्या पराट्या इत्यादीपासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की आपल्याकडे मळी (मोलॅसीस) पासून इथेनॉल उत्पादन होत असून याबरोबरच आता मका, गहू, बांबू यापासूनदेखील इथेनॉलनिर्मिती शक्य होणार आहे. ब्राझील, अमेरिका, कॅनडा या देशात शेती उत्पादनातून थेट इथेनॉलचे उत्पादन वीस टक्क्यांपासून शंभर टक्केपर्यंत होत असून तेथे नव्या वाहनात शंभर टक्के, तर जुन्या वाहनांमध्ये तीस टक्के इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे. म्हणूनच गावोगावी मका, ऊस, धान, बगॅस, बीट तसेच सुमारे एकशे सत्तावीस जाती विकसित असलेल्या बांबूपासूनदेखील इथेनॉल प्रकल्प उभे केले जाणार असून यामुळे गावागावांमध्ये लाखो युवकांना रोजगारनिर्मिती होऊन देश प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी प्रमोद चौधरी, कारखान्याचे उपाध्यक्ष बबनराव गायकवाड, अॅड. विकास रासकर, नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, किसन शिंदे, माधव राऊत, पांडुरंग कदम, तहसीलदार विवेक साळुंखे उपस्थित होते.