विज्ञानाचा ग्रामीण भागातील प्रसार कौतुकास्पद
By admin | Published: February 29, 2016 01:00 AM2016-02-29T01:00:45+5:302016-02-29T01:00:45+5:30
आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो,
खोडद : ‘‘आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो, ही बाब अभिमानास्पद तर आहेच, शिवाय अविश्वसनीय आहे. जीएमआरटी प्रकल्पाच्या परिसरात राहणारे ग्रामस्थ व या प्रकल्पाशी असणारे त्यांचे नाते आणि सुसंवाद हा कौतुकास्पद वाटतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिकदृष्ट्या क्रांती झाली नसली, तरी या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील पर्यावरण व शेती ही सुरक्षित असून, शुद्ध हवेचा श्वास येथे घेता येतो,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे केले.
जागतिक विज्ञानदिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित केलेल्या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन करताना राव बोलत होते. या वेळी जीएमआरटीचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, जीएमआरटीचे मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सौरभ राव म्हणाले, की जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्याचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास झाला आहे. या प्रकल्पामुळेच तालुक्यातील शेतजमिनी सुरक्षित राहिल्या. या जमिनी प्रदूषणमुक्तदेखील आहेत.
या विज्ञान प्रदर्शनात लहान-लहान मुलांनी आणलेले प्रकल्प व त्यांची विज्ञानाविषयीची आवड पाहून खूप आनंद वाटला. दर वर्षी विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प आणणारे व विविध प्रयोग करणारे विद्यार्थी आपल्यासाठी अनमोल असून, भविष्यात ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. हा एवढा मोठा असूनही ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात नसणारा वाद ही समाधानकारक बाब आहे. जीएमआरटी प्रकल्पाकडे येणारे सर्व रस्ते ३.५० मीटर रुंदीचे असून, या रस्त्यांचे ५.७५ मीटरचे रुंदीकरण करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले होते. रविवारी या प्रदर्शनाला ७ हजार विज्ञानप्रेमींनी भेट दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल उपयुक्त माहिती मिळाली. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रदर्शनातील प्रकल्पाची प्राथमिक (५ वी ते ७ वी),
माध्यमिक (८ वी ते १० वी),
उच्च माध्यमिक (डिप्लोमा/
डिग्री, बीएससी, एमएससी)
आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा ४ गटामध्ये विभागणी केली होती.
यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक
देण्यात येणार आहे.
प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या (नोंदणीकृत) विद्यर्ऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे जे. के. सोळंकी यांनी सांगितले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्रत्येक प्रकल्पाची व प्रयोगाची जिल्हाधिकारी राव यांनी सखोल माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांकडून माहिती घेत असताना राव यांची जिज्ञासू वृत्ती, विज्ञान समजून घेण्याविषयीची आंतरिक ओढ, वयाने अगदी लहान असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना असणारा आदर व आपुलकी, विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न किंवा शंका विचारण्याचे कौशल्य आदी बाबींचे या वेळी प्रकट दर्शन होत होते.
बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले, बिबट्यांपासून आपण
आपले संरक्षण कसे करावे, शेतीमधील क्रांती, पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला
ऱ्हास, वातावरणात वेळोवेळी
होत असलेले बदल, जीएमआरटीचे कार्य, पल्सार म्हणजे काय आदी बाबी या
वेळी राव यांनी समजून
घेतल्या.