सह्याद्रीच्या निसर्गाचे संवर्धन आवश्यक
By admin | Published: March 26, 2017 01:53 AM2017-03-26T01:53:53+5:302017-03-26T01:53:53+5:30
सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक
पिंपरी : सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. प्राणी, वनस्पती नष्ट होण्यामागची कारणे म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट आणि विकासासाठी वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर वापर हे आहे. दख्खनचे पठार, कोकण किनारा असो किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा या जैवविविधतेने नटलेल्या निसर्गाचे संर्वधन होणे गरजेचे आहे, असे मत पुणे विभागीय वन अधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डीच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यात तीन दिवसीय विद्यापीठस्तर जैवविविधता शिबिर आयोजित केले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी फटांगरे बोलत होते. अहमदनगर, नाशिक,पुणे विभागातील १०५ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होेते. फटांगरे म्हणाले की, वन, तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित केली आहेत. वन विभाग आदिवासींवर गदा आणण्यासाठी नाही. १९९२ मध्ये शासनाने ग्रामीण लोकांच्या सहभागातून वन विकास संकल्पना राबवली. हरितसेना संकल्पनेत विद्यार्थी, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे.
कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.डी.पाटील यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. आयोजन प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
विद्यापीठाचे मानववंशशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम गंभीर, विभागीय वन अधिकारी फटांगरे, वनपाल तुषार ढमढेरे, वन निरीक्षक अधिकारी श्रीशैल पाटील, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील उपस्थित होेते. विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, प्रा.गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडके, प्रा. अर्चना ठुबे, प्रा. मीनल भोसले, प्रा. अंजली अकीवटे आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)
राज्याचे मानचिन्ह असणारा प्राणी शेकरू, राज्याचे निसर्ग मानचिन्ह असणारे फुलपाखरू ब्युमॉरमॉन, चिमुकल्या मधमाशीपासून महाकाय अॅटलास पतंगापर्यंत आणि झाडापाशी समरूप होणाऱ्या हरणटोळापासून सळसळणाऱ्या फणीनागीपर्यंत सर्वांना सांभाळणाऱ्या या वनांचा परिसर पाहण्याची संधी वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली. यात नाईट ट्रॅक, तसेच वनभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे पवित्र स्थान पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.