शिक्षण विभागात पदोन्नती घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:16+5:302021-01-25T04:13:16+5:30
पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागात नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती आणि कर्मचा-यांना सेवेत कायम करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागात नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती आणि कर्मचा-यांना सेवेत कायम करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी विद्यमान शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत यांच्यासह माजी शिक्षण प्रमुख सुधाकर तांबे आणि रामचंद्र जाधव यांच्या कार्याकाळात झालेल्या नेमणूका संशयाच्या भोव-यात अडकल्या आहेत.
पालिकेचे शिक्षण मंडळ काही वर्षांपुर्वी बंद करण्यात आले. परंतु, हे मंडळ अस्तित्वात असताना राऊत, तांबे आणि जाधव यांनी प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे. मंडळावर कायमच भरतीवरुन टीका होत आलेली आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी विद्यमान प्रमुख मीनाक्षी राऊत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सेवाभरती, पदोन्नती आणि सेवालाभ देत असताना नियमांचा भंग केल्याचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांनी यमुना करवंदे यांची भांडारपाल या पदावरुन थेट वरीष्ट अधिक्षक या पदावर नेमणूक करताना दोन पदे वगळून पदोन्नती दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासोबतच वरिष्ठ लेखनिक गणेश भारती यांना सर लेखनिकपदी नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची सेवा तीन वर्षे पुर्ण झाली नसतानाही पदोन्नती देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच नोकरीमध्ये भरती होताना आवश्यक असलेली एमएससीआयटीची परिक्षा दिलेली नसतानाही सेवेत घेण्यात आले आहे. एवढेच काय परंतु, हंगामी उमेदवारांना सुध्दा कायम करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राऊत यांनी घेतलेल्या नियमबाह्य निर्णयांमुळे पालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. काही पदे तर मान्य नसतानाही झालेल्या भरतीमुळे पालिकेचे नुकसान झाल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
====
माजी शिक्षण प्रमुख सुधाकर तांबे यांच्या कार्यकाळात एका उमेदवाराला भांडारपाल पदावरुन थेट वरिष्ठ अधिक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
====
माजी शिक्षण प्रमुख रामचंद्र जाधव यांना दिलेल्या नोटीसीमध्ये जाधव यांनी सहा महिन्यांसाठी हंगामी सेवक म्हणून घेण्यात आलेल्या लेखनिकांना कायम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.