समाजसेवा करणा-यांना प्रोत्साहन देणे लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी :अनंत गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:39 PM2018-08-13T20:39:57+5:302018-08-13T20:40:43+5:30
समाजात अनेक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रस्ट हे समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याच प्रयत्न करतात.
पुणे : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष हेतूने समाजाचे अंशत: ऋण फेडण्याचे काम ही माणसे करत असतात. समाजात अनेक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रस्ट हे समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याच प्रयत्न करतात. अशा समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्साहन देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या बाजीराव रस्त्यावरील नातूबाग पटांगण येथे झालेल्या म्हसोबा उत्सवात भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, सारथीचे संचालक प्रशांत पवार, डॉ.सतिश देसाई, निर्मला केंढे, रुपाली पाटील-ठोंबरे, नीता परदेशी, बाळासाहेब अमराळे, अॅड. प्रताप परदेशी, अशोक गावडे, महेंद्र कडू, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, उमंग शहा, सौरभ बेंद्रे, अश्विनी शहा आदी यावेळी उपस्थित होते.
संगीत क्षेत्रात राहुल रानडे, उद्योग क्षेत्रात माणिकचंद उद्योगसमुहाचे संचालक प्रकाश धारीवाल, धार्मिक क्षेत्रात रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अॅड. विजयराज दरेकर, व्यापार क्षेत्रात दाते मांडववालेचे संचालक दीपक दाते, पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांना भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमात माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. उपक्रमास वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांचे विशेष सहकार्य मिळाले.
डॉ. मोरे म्हणाले, समाज हा पुरुष आहे असे मानले तर त्याच्या अंगावरील दागिने म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत असे पुरस्कारार्थी, हे समाजाचे भूषण आहेत.अभिनेत्री अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले.