प्रचाराचा धुरळा
By admin | Published: October 13, 2014 12:37 AM2014-10-13T00:37:57+5:302014-10-13T00:37:57+5:30
प्रचाराला अवघे काही तास उरले असताना रविवारची सुटी ही उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरली. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात रॅली व भेटींवर भर दिल्याचे दिसून आले.
पिंपरी : प्रचाराला अवघे काही तास उरले असताना रविवारची सुटी ही उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरली. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात रॅली व भेटींवर भर दिल्याचे दिसून आले.
रविवार असल्यामुळे कसा अधिक प्रचार करायचा याचे नियोजन शनिवारी रात्रीच झाल्याने सकाळपासून सर्व कार्यकर्ते
प्रचारात उतरले. मागील १२ ते १३ दिवसांपासून सुरू असलेला
प्रचाराच्या झंझावाताची सांगता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. सोमवारी संध्याकाळी ५ ला प्रचार तोफा थंडावणार असल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठींसाठी काही तासच हातात असल्यामुळे उमेदवारांनी रॅलीवर भर दिला.
अनेक उमेदवारांनी सोसायट्यांकडे धाव घेतली. सोसायटीमध्ये अनेक मतदारांशी एकाच वेळी संपर्क साधता येत असल्यामुळे व सुटी असल्याने उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तेथे धाव घेतली. सगळ्या सोसायट्यांत छोट्या सभाच सुरू असल्याचे चित्र होते. तेथील मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी उमेदवारांनी सोसायटीचे अनेक प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले, तर पक्षाचा जाहीरनामाही त्यांना दिला.
पदयात्रा, जीपयात्रा यांच्या माध्यमातून सगळ्याच उमेदवारांनी रविवारी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. शहरामध्ये रॅली, पदयात्रांची धूम होती. प्रतिस्पर्धी पक्षांच्या यात्रा समोरासमोर आल्यामुळे अनेक ठिकाणी घोषणायुद्धही रंगले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पर्यायाने मतदारच अडचणीत सापडला. उमेदवार जास्तीत जास्त मतदारपर्यंत कसे जाता येईल यासाठी सर्वच प्रमुख कार्यकर्ते व घरातील सर्व लहान-मोठी मंडळीही प्रचारात मोठ्या प्रमाणात दिसत होती. प्रत्येकजण आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून आला.
उमेदवारांनी रॅली, गाठीभेटी याबरोबरच मोबाईलवरही व्हाईस कॉल, मेसेज, नेत्यांचे भाषण, उमेदवाराने केलेल्या कामाच्या छोट्या व्हिडिओ क्लिप तयार करून त्या अनेकांना पाठवल्या. यामुळे मतदारांवर प्रचाराचा भडिमार सहन करावा लागला. प्रत्येक रस्त्यावर, चौकात प्रचाराचा धडाका उडाला होता. शेवटचा दिवस म्हणूनच उमेदवारांची सगळी यंत्रणा कामाला लागली होती. यामुळे प्रत्येक ठिकाणी एका पक्षाची रॅली गेली की, दुसऱ्या पक्षाची रॅली येत असल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. शक्तिप्रदर्शनामुळे रविवारी प्रचाराची रणधुमाळी उडाली.