प्रचारातील भोजन, चहा झाला स्वस्त
By admin | Published: October 6, 2014 06:43 AM2014-10-06T06:43:18+5:302014-10-06T06:43:18+5:30
निवडणूक आयोगाने चहाचा दर सहावरून पाच, तर सामिष भोजनाचा दर १६० वरून १२० रुपये देण्यात आला असून, मंडप, खुर्ची या साहित्याच्या दरातही कमालीची घट दाखविण्यात आली आहे.
पुणे : नाश्ता, भोजन, प्रचार साहित्याच्या सरकारी दरात लोकसभेच्या तुलनेत घट झाली आहे. निवडणूक आयोगाने चहाचा दर सहावरून पाच, तर सामिष भोजनाचा दर १६० वरून १२० रुपये देण्यात आला असून, मंडप, खुर्ची या साहित्याच्या दरातही कमालीची घट दाखविण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली आहे. प्रचारकाळात उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या दैनंदिन खर्चाची तपासणी केली जाते. शासनाने दैनंदिन खर्चाच्या तपासणीसाठी प्रत्येक वस्तूचे दरपत्रक तयार केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्य शासनाने बिस्किट पाच रुपये, साबुदाणा खिचडी, उपीट, पोहे यांचा दर दहा रुपये दिला आहे. शासनाने कापडी मांडवाचे दरही ६७ रुपये निश्चित केला आहे. लोकसभा निवडणुकीत कापडी मंडपाचा दर प्रति चौरस मीटर ३०० रुपये होता. लोकसभा निवडणुकीत प्लॅस्टिक खुर्चीच्या भाड्याचा दर दहा रुपये प्रति नग होता. आता विधानसभेसाठी हाच दर प्रतिखुर्ची ७ रुपये २० पैसे झाला आहे. (प्रतिनिधी)