सोशल मीडियावर प्रचाराची धूम
By admin | Published: February 16, 2017 03:40 AM2017-02-16T03:40:31+5:302017-02-16T03:40:31+5:30
तंत्रज्ञानाच्या युगात आता निवडणुका आणि प्रचारही हायटेक झाल्याचे चित्र यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात
पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात आता निवडणुका आणि प्रचारही हायटेक झाल्याचे चित्र यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात पहायला मिळत आहे. प्रचारपत्रके, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी, रिक्षांतून आणि फलकांद्वारे प्रचाराबरोबरच राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पक्षांतील प्रमुख नेत्यांची भाषणे, जाहीरनामे, पक्षाच्या कामांची प्रसिद्धी आदी बाबी फेसबुक पेजवर अपलोड केल्या जात आहेत.
उमेदवारांचा जोरदार प्रचार व्हावा, यासाठी राजकीय पक्षांतर्फे आयटी सेल स्थापन करण्यात आले आहेत. या सेलद्वारा फेसबुक पेज, टिष्ट्वटर आदी माध्यमांतून अपडेट अपलोड केले जात आहेत. या अपडेटना सामान्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुक्त व्यासपीठ असलेल्या सोशल मीडियावरुन मतदारांकडून कमेंटच्या माध्यमातून कधी शाबासकीची थाप, तर कधी कानपिचक्याही काढल्या जात आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर जाहीरनामा विस्तृत स्वरूपात अपलोड करण्यात आला आहे. ‘निष्क्रियतेची १० वर्षे’ अशा टॅगखाली पुणे महानगरपालिकेने आजवर नागरी समस्यांबाबत कशा प्रकारे उदासिनता दाखवली, यावर बोट ठेवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा, प्रमुख उमेदवारांची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आदी माहिती यामध्ये अपलोड करण्यात आली आहे. ‘हसू फुललं, कमळ उमललं’ अशा ओळींमधून पक्षाचा प्रचार केला जात आहे.
‘पुणेकरांचा विश्वास, हाच राष्ट्रवादीचा, श्वास’ अशी टॅगलाईन वापरत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा धुरळा उडवला आहे. ‘होय! राष्ट्रवादीने हे केलं’ अशा मथळ्याखाली ई-लर्निंग, मॉडेल स्कूल, बचतगट आदी कामांची प्रसिद्धी करणारे व्हिडीओ अपलोड केले आहेत.