धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:55+5:302021-08-01T04:10:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ...

Prompt action on rehabilitation of dangerous villages | धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही

धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून जाहीर झाली असून, या गावांना भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माळीण येथील घटना घडल्यानंतर ही गावे अतिसंवेदनशील झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे यांसारख्या घटना घडू लागल्या आहेत. या धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिले आहेत.

आपत्ती निवारण कायदा २००५ या कायद्याअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे भविष्यात पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे बैठक पार पडली. यावेळी आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित गावांकडे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकांचे संमतीपत्र सादर करावे व ग्रामपंचायतीकडे घरांच्या नोंदी असलेले ८ अ उतारे सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

महाड येथील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा समोर आला. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रांताधिकारी, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी धोकादायक गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लगेचच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागाचा दौरा करून धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने ता. ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे धोकादायक गावचे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार अनंत गवारी, सुनील रोकडे, संबंधित गावचे ग्रामस्थ, ग्रामसेवक इ. उपस्थित होते. बैठकीमध्ये धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागांचे जागा मालकांचे संमतीपत्र ता.४ ऑगस्ट पर्यंत प्रशासनास सादर करावे व ज्या घरांचे पुनर्वसन करावयाचे आहे, त्या घरांच्या ग्रामपंचायतील नोंदी असल्याचे उतारे सादर करण्याविषयी ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर संबंधित जागेत पुनर्वसन करण्याविषयी ग्रामसभेचे ठराव, लोकसंख्येचे दाखले, मागणी इतिवृतांत सादर करण्याविषयी ही सांगण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी तहसील कार्यालय येथे बैठक पार पडली. बैठकीत जागा मालकांचे संमतीपत्र सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

छायाचित्र-कांताराम भवारी

Web Title: Prompt action on rehabilitation of dangerous villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.