बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पुरावे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 06:45 PM2018-10-06T18:45:04+5:302018-10-06T18:58:35+5:30
देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे.
पुणे : विरार येथील बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणात सरकारी पक्षांकडून पुरावे घेण्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद होऊन पुढील काही महिन्यांमध्ये या खटल्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
देशातील शेवटचे टाडा प्रकरण असलेल्या या खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर सुरू आहे टाडा खटला चालविण्यात येत आहे. सुरेश दुबे यांनाही जागेचा ताबा सोडावा आणि हप्ता देण्याबाबत घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या भाई ठाकूर यांच्यामार्फत देण्यात आल्या होत्या. गुंडाकडून ज्या जागेवर ताबा मारला गेला, ती जागा खाली करण्यासाठी दबाब येऊ लागल्यानंतर सुरेश दुबे यांनी वकीलांमार्फत ठाकूर यांना नोटीस बजावली होती. याच कारणातून ९ आॅक्टोबर १९८९ (वय २९ वर्षांपूर्वी)ला बिल्डर दुबे हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर पेपर वाचत बसले असताना त्यांची ६ ते ७ आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांचीही आरोपी करण्यात आले होते. पोलीस आरोपींना साथ देत आहेत. त्यामुळे मुख्य आरोपी सोडून पोलिसांनी इतरांना अटक केली, अशी चर्चा होती. याप्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आनंद पाडेकर यांचा सहभाग असल्याचे आरोप झाले.
१९९२ मध्ये स्थानिक राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर फिर्यादी डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी रेल्वे पोलीस महासंचलकांकडे दाद मागितली होती. १६ मे १९९७ रोजी १७ आरोपींना पुणे टाडा न्यायालयाने सोडले. त्यामुळे डॉ. दुबे यांनी अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक अनंत पाटील यांना सुरेश दुबे हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यावेळी या गुन्ह्यात फरार असलेले जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दिपक ठाकूर, गजानन अनंत पाटील, संजय चैत्या कडू, पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाडेकर यांच्यावर तसेच सध्या मृत असलेले भास्कर ठाकूर आणि नारायण गौडा यांच्या विरुध्द पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.
२००४ मध्ये याप्रकरणी खूनप्रकरणी, टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. आत्तापर्यंत याप्रकरणी सरकारी पक्षाने १०२ साक्षीदार तपासले असून २ हजार ६०० पेक्षा अधिक कागदपत्रे न्यायालयासमोर आली आहेत. याप्रकरणी खटल्यातील विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ सतिश मिश्रा यांनी न्यायालयाला सरकार पक्षाचे पुरावे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संजय जैन यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून फिर्यादीच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी शनिवारी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावरील सुनावणी १७ आॅक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, भारतातील हा शेवटचा टाडा खटला असल्याचे अॅड. मिश्रा यांनी सांगितले.