शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात आरपीआय जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:11 AM2019-04-21T01:11:24+5:302019-04-21T01:12:01+5:30

‘साथी हाथ बढाना’; महायुतीचा मोदींच्या नावाने प्रचार, नेत्यांची दिलजमाई

In the propagation of Shiv Sena candidate, RPI jooomat | शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात आरपीआय जोमात

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात आरपीआय जोमात

Next

- हणमंत पाटील 

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार महाआघाडीकडून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप व आरपीआय (आठवले गट) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बारणे यांचे प्रतिस्पर्धी असलेले आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. दोघांमध्ये पारंपरिक वाद आहेत. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात आली. त्यानंतर बारणे यांचा उमेदवारीअर्ज भरताना जगताप आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर मात्र जगताप हे जाहीर कार्यक्रमात फारसे दिसले नाहीत. तसेच, जगतापसमर्थक भाजपाचे नगरसेवकही केवळ तोंड दाखविण्यापुरते प्रभागातील कोपरा सभा व बैठकांना उपस्थित राहताना दिसत असून, सक्रिय नसल्याचे चित्र आहे.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महायुतीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणीही शिवसेना, रिपब्लिकनचे कार्यकर्ते दिसतात. मात्र, भाजपचे कार्यकर्ते केवळ हजेरी दाखविण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. रिपब्लिकनच्या स्थानिक नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून लोकसभेच्या प्रचारात सक्रिय सहभाग दिसत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमच्या पातळीवर काम सुरू आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये दिलजमाई झाली, तरी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसत नाही.

विधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षांच्या गोटात काय चाललेय?
१. पिंपरी : हा शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा मतदारसंघ असून, येथे भाजपची ताकद वाढली आहे. आरक्षित मतदारसंघात महायुतीच्या प्रचारात भाजपपेक्षा आरपीआय सक्रिय असल्याचे चित्र.
४. पनवेल : येथे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर हे मतदारसंघातील शिवसेनेपेक्षा अधिक सक्रिय आहेत. भाजपाला अधिक मान दिला असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
२. चिंचवड : या विधानसभेत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आहेत. बारणे व जगताप यांची दिलजमाई झाली, तरी मतदारसंघात समर्थकांचे मनोमिलन झाले नसल्याने ते प्रचारात सक्रिय दिसत नाहीत.
५. उरण : मतदारसंघात शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर आणि भाजपचे पदाधिकारी एकत्रितपणे महायुतीचा प्रचार करीत आहेत. येथे महायुतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य देण्याची धडपड दिसत आहे.
३. मावळ : येथे भाजपचे आमदार बाळा भेगडे असून, त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी सुनील शेळकेही सक्रिय आहेत. या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते पुढे आणि शिवसेनेचे नाराज गट प्रचारात मागे दिसून येत आहे.
६. कर्जत : येथे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड असूनही गतपंचवार्षिक निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मताधिक्य होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पुन्हा आघाडी घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.

युतीचा एकदिलाने प्रचार
मावळ लोकसभेच्या प्रचारात महायुतीतील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप असे सर्व मित्रपक्ष एकदिलाने काम करीत आहेत.
- श्रीरंग बारणे, उमेदवार, शिवसेना

भाजपचा सक्रियतेचा दावा
नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. - अमोल थोरात,
संघटक सरचिटणीस, भाजप

प्रभागनिहाय बैठकांवर भर
आमचे नेते रामदास आठवले यांचे आदेश आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय प्रत्येक १० कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आहे. प्रचारासाठी बैठका, कोपरा सभा सुरू आहेत. - चंद्रकांता सोनकांबळे, स्थानिक नेत्या, आरपीआय

Web Title: In the propagation of Shiv Sena candidate, RPI jooomat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.