प्रशासनाकडून एमपीएससीच्या परीक्षेची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:12 AM2021-03-21T04:12:21+5:302021-03-21T04:12:21+5:30
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ‘एमपीएससी’ने १४ मार्च रोजी आयोजित केलेली ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०’ पुढे ढकलली होती. ...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ‘एमपीएससी’ने १४ मार्च रोजी आयोजित केलेली ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०’ पुढे ढकलली होती. परंतु, वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे त्यानंतर राज्य सरकारने ही परीक्षा २१ मार्चला घेतली जाईल,असे स्पष्ट केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, जिल्हा प्रशासनाने रविवारी होणा-या परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यातील ७७ परीक्षा केंद्रांवर सुमारे ३१ हजार उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या सुमारे २ हजार ७०० कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआय चाचण्या केल्या आहेत प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सुमारे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. परीक्षा केंद्रांवर कर्मचा-यांची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर तीन कर्मचारी नियुक्त केले आहेत.
प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त २४ उमेदवार असणार आहेत, असे स्पष्ट करून कटारे म्हणाल्या,
परीक्षेसाठी येणा-या प्रत्येक उमेदवाराचे तापमान तपासले जाणार असून, आयोगाने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीकडून तीन वेळा परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन केले जाईल. तसेच या एजन्सीने सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. प्रश्नपत्रिका पोहोचवणे आणि उत्तर पत्रिका जमा करण्याचे योग्य नियोजन प्रशासनाने केले आहे.