एफआरपी थकबाकीवरून किसनवीर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:47+5:302021-04-20T04:12:47+5:30
पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली म्हणून साखर आयुक्त कार्यालयाने साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता ...
पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली म्हणून साखर आयुक्त कार्यालयाने
साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली.
कारखान्यावर ऊस दिलेल्या शेतकऱ्र्यांचे ७६ कोटी १८ लाख रूपये कारखान्याकडून देणे बाकी आहे. त्यावरून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारवाईचे आदेश दिले.
कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामामध्ये ३ लाख ८५ हजार ७० मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याची या हंगामाची निव्वळ एफआरपी प्रति मेट्रिक टनास २५६९. ९४ रुपये इतकी आहे. ३१ मार्चअखेर देय एफआरपी रक्कम थकीत ठेवून कारखान्याने ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.
आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याला नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. १५ मार्च रोजी सुनावणी घेतली. कारखान्यास निर्यात साखर विक्री कराराप्रमाणे रक्कम प्राप्त होणार आहे. त्यातून पुढील ७ दिवसांत शेतकऱ्र्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याचे कारखान्याने सुनावणीत सांगितले. मात्र, त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. त्यामुळे आयुक्त गायकवाड यांनी ही कारवाई केली.