फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेची मालमत्ता आज होणार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 09:39 AM2021-02-24T09:39:55+5:302021-02-24T09:41:23+5:30
हवेली तहसीलदार व पुणे शहर तहसीलदार करणार जप्तीची कारवाई
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि फरार घोषित केलेल्या रवींद्र बऱ्हाटे याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश न्यायालयाने दिले होते़ जिल्हाधिकार्यांमार्फत आज बुधवारी बर्हाटे यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार व पुणे शहर तहसीलदार आज सकाळी १० ते १२ च्या दरम्यान जप्तीची कारवाई करणार आहेत.
रवींद्र बर्हाटे यांच्या मालमत्तेपैकी कोंढवा येथील लुल्लानगरमधील मधुसुधा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट, धनकवडी येथील तळजाई पठारमधील सरगम सोसायटीमधील एका प्लॉटवरील बंगला, तसेच याच सरगम सोसायटीमधील मोकळा प्लॉट आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन अशा ५ मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र लक्ष्मण बर्हाटे, दिप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन व अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, रवींद्र बर्हाटे हा तेव्हापासून फरार झाला आहे. या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बर्हाटे व त्याच्या टोळीविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारावरुन फसवणूक करणे, खंडणी मागणे, पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे अशा विविध कलमाखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बर्हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतरही पोलिसांना तो सापडू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरारी घोषित करुन मालमत्ता सीआरपीसी ८३ प्रमाणे जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आज होणार आहे.