मिळकत कर भरा आता भीम अॅपसह पेटीएम वर : महापालिकेकडून लवकरच सुविधा उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:30 PM2019-02-19T18:30:35+5:302019-02-19T18:36:04+5:30
नागरिकांना महापालिकेच्या ५ ते १० टक्के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
पुणे : महापालिकेच्या मिळकतकरासह अन्य विभागांचे शुल्क लवकरच केंद्राच्या भीम मोबाईल अॅपसह पेटीएम या ऑनलाइन वॉलेटवरही भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मिळकतकर आणि महापालिकेचे इतर सेवा शुल्क भरण्यासाठी आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. या अॅपद्वारे बील भरल्यानंतरही कर भरणा-या नागरिकांना सवलतही मिळणे शक्य होणार आहे.
महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मिळकतकर आहे. महापालिकेकडून मिळकतकर रोख रकमेसह धनादेश आणि ऑनलाइन बॅकींगद्वारे हे शुल्क स्विकारले जाते. त्यात दरवर्षी सुमारे ४६ टक्के नागरिक कॅशलेस स्वरुपात मिळकतकर भरतात. उर्वरीत ५४ टक्के नागरिक अद्यापही रोख स्वरुपातच महापालिकेचा मिळकत भरतात. मात्र, देशात झालेल्या नोटाबंदीनंतर ऑनलाईन स्वरुपात व्यवहारांचे प्रमाण वाढले असून ई-वॉलेटचा वापर वाढला आ त्यातही केंद्र शासनाच्या भीम या अॅपसह पेटीएम कडूनही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहारांना कॅशबॅकच्या सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून त्याचाही वापर वाढलेला आहे. मात्र, महापालिकेकडून या दोन्ही पला अद्याप गेट वे देण्यात आलेला नाही. त्यामुळे नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडियाच्या काही अधिका-यांनी महापालिकेच्या लेखापाल विभागास प्रस्ताव दिला असून, महापालिकेचे कर या वॉलेटच्या माध्यमातून स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यास तयारी दर्शविली आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन ई-वॉलेटचा वापर केल्यास कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कॅशबॅकची सुविधा दिली जाते. हे वॉलेट महावितरणकडूनही वापरले जात असल्याने वीज बील भरल्यानंतर नागरिकांना कॅशबॅक मिळते. त्याच धर्तीवर महापालिकेचे मिळकतकर भरल्यासही ही सुविधा मिळणार आहे. अनेकदा मिळकतकराची रक्कम ५ हजारांच्या आसपास असते, अशा छोट्या रकमा असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या ५ ते १० टक्के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.