जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 05:51 PM2018-11-19T17:51:05+5:302018-11-19T17:56:28+5:30
दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या चा-याचे नियोजन करण्यात आले असून चा-यासाठी राज्य शासनाला १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत अडीच मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.त्यामुळे दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यात संबंधित अधिका-यांना चारा उपलब्धतेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पाणी नसलेल्या जलाशयाच्या किती एकर जमिनीमध्ये चारा पिके घेता येतील.याबाबतची माहिती येत्या सात दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत पुरतो. जानेवारी महिन्यानंतरच्या चा-यासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून जूनपर्यंतच्या चा-याचे नियोजन काण्यात आले असून सुमारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजन केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशयातील पाणी संपले आहे.त्यामुळे कोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीत गाळपेरा किंवा इतर भागात केवळ चारा पिके घेतेली जाणार असून शेतक-यांंना आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासंदर्भात संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात आली आहे.